
राज्याच्या राजकारणात सध्या ‘भावी मुख्यमंत्री’पदाच्या चर्चांना उधाण आले असून, आता या शर्यतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नाव आघाडीवर आले आहे. बारामती शहरात सुनेत्रा वहिनींच्या समर्थनार्थ लागलेल्या एका खास फ्लेक्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे, त्यांचे पुत्र जय पवार यांनी व्यक्त केलेल्या इच्छेनंतर ही फ्लेक्सबाजी झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

फ्लेक्सवर नेमकं काय लिहिलंय?

बारामती शहराच्या मध्यवर्ती भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा फ्लेक्स लावला आहे. यावर अत्यंत ठळक अक्षरात मजकूर छापण्यात आला आहे:
“माननीय सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार… होय मुख्यमंत्रीच!”
“महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून उभा महाराष्ट्र तुमच्याकडे पाहतोय…” हा फ्लेक्स सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, बारामतीकरांमध्ये यावर जोरदार चर्चा सुरू आहे.

जय पवार यांच्या विधानाने ठिणगी पडली
काही दिवसांपूर्वीच सुनेत्रा पवार यांचे पुत्र जय पवार यांनी माध्यमांशी बोलताना आपली इच्छा व्यक्त केली होती. “२०२९ च्या निवडणुकीनंतर सुनेत्रा वहिनींनी राज्याचे नेतृत्व करावे आणि त्या मुख्यमंत्री व्हाव्यात,” असे विधान त्यांनी केले होते. जय पवार यांच्या या विधानानंतर महायुतीतील इतर पक्षांच्या नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.
विरोधकांकडून ‘टोलेबाजी’
जय पवार यांच्या या स्वप्नावर सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही निशाणा साधला आहे: “मुख्यमंत्री होण्यासाठी आमदारांचे पाठबळ लागते, केवळ इच्छा असून चालत नाही,” असा थेट टोला त्यांनी लगावला. “सुनेत्रा पवार पोटनिवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आल्यामुळे जय पवार यांना अशी स्वप्ने पडू लागली असावीत,” अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.
पोटनिवडणुकीतील विजयानंतर वाढली ताकद
सुनेत्रा पवार यांनी नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर अजित पवार गटाचा आत्मविश्वास वाढलेला दिसत आहे. बारामती हा पवारांचा बालेकिल्ला असल्याने, येथूनच आता “पहिल्या महिला मुख्यमंत्री” पदाची मागणी जोर धरू लागली आहे.आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बारामतीतील हे ‘फ्लेक्स वॉर’ महायुतीमध्ये कोणते नवीन वळण घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

