Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात जमिनीच्या वादातून ‘सैराट’ थरार! मेहुण्याने भाऊजींवर चालवली कात्री; सख्ख्या बहिणीलाही अश्लील शिवीगाळ

जमिनीच्या तुकड्यासाठी रक्ताची नाती कशी विसरली जातात, याचा धक्कादायक प्रत्यय पुण्यात आला आहे. वडिलोपार्जित संपत्तीत वाटा मागण्यासाठी न्यायालयात धाव घेतल्याचा राग मनात धरून, एका मेहुण्याने आपल्याच भाऊजीवर कापड कापण्याच्या कात्रीने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात भाऊजींच्या हाताचा अंगठा फॅक्चर झाला असून, भररस्त्यात घडलेल्या या प्रकाराने सदाशिव पेठ परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

याप्रकरणी विजयकुमार रणजितप्रसाद कनोजिया यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी केदार प्रकाश धनवटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सदाशिव पेठेतील उद्यान कार्यालयाजवळ भरदिवसा घडली.

न्यायालयातील तक्रारीचा होता राग

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजयकुमार यांच्या पत्नीचा (आरोपीची सख्खी बहीण) त्यांच्या वडिलोपार्जित संपत्तीवर कायदेशीर हक्क आहे. मात्र, केदार धनवटे हा संपत्तीत वाटा देण्यास नकार देत होता. अखेर आपला हक्क मिळवण्यासाठी कनोजिया कुटुंबाने पुणे सत्र न्यायालयात धाव घेतली होती. आपल्याविरुद्ध कोर्टात तक्रार केल्यामुळे केदार प्रचंड संतापलेला होता.

कात्रीने केला सपासप वार

२३ मार्च रोजी आरोपी केदार आणि फिर्यादी विजयकुमार आमनेसामने आले. यावेळी त्यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. वादाचे रूपांतर हाणामारीत होताच, केदारने आपल्या जवळ असलेली कपडे कापण्याची मोठी कात्री काढली आणि विजयकुमार यांच्यावर वार केला. हा वार हातावर रोखला गेल्याने विजयकुमार यांचा अंगठा गंभीररीत्या जखमी होऊन फॅक्चर झाला.

सख्ख्या बहिणीचाही केला अपमान

हा नराधम एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने आपल्या सख्ख्या बहिणीलाही सर्वांसमोर अत्यंत हीन दर्जाची अश्लील शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. भररस्त्यात सुरू असलेला हा राडा पाहून परिसरातील नागरिक भयभीत झाले होते.

पोलीस कारवाई

विजयकुमार कनोजिया यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी केदार धनवटे विरुद्ध मारहाण करणे, गंभीर दुखापत करणे आणि शिवीगाळ करणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून, कौटुंबिक वादातून झालेल्या या खुनी हल्ल्याची पुणे शहरात चर्चा सुरू आहे

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!