Latest Marathi News
Ganesh J GIF

“कांदा झाला रक्ताचा: भर उन्हात राबणाऱ्या बळीराजाचा शेतातच करुण अंत!”

राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता या उष्णतेने जीव घेण्यास सुरुवात केली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात कांदा काढणी करणाऱ्या एका महिला मजुराचा अचानक मृत्यू झाला आहे.आंबेगावातील हा उष्माघाताचा पहिला संशयित बळी असल्याचे मानले जात आहे. नकुशा बाळू सुपे असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

काम करत असतानाच कोसळल्या…
नकुशा बाळू सुपे या सध्या आंबेगाव तालुक्यातील आमोंडी येथे शेतमजुरीसाठी आल्या होत्या. सध्या कांदा काढणीचा हंगाम जोरात सुरू असल्याने त्या दुपारच्या रणरणत्या उन्हात शेतात काम करत होत्या. दुपारी उन्हाची तीव्रता अधिक असताना त्यांना अचानक चक्कर आली. त्यानंतर त्या जागीच कोसळल्या. त्यांना पडलेले पाहताच त्यांच्यासोबत असलेल्या इतर कामगारांनी तात्काळ त्यांना शिनोली येथील खासगी रुग्णालयात हलवले. परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र दुर्दैवाने, तिथे डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले.

वैद्यकीय तपासणी आणि संशय
घोडेगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीनंतर हा मृत्यू उष्माघातामुळे झाला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या त्यांचा मृतदेह मंचर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच प्रशासकीय पातळीवर अधिकृत कारणाची नोंद केली जाणार आहे.

विदर्भात सूर्य आग ओकतोय
पुणे जिल्ह्यात ही घटना घडली असतानाच, विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातही उष्णतेची लाट अतिशय तीव्र झाली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच चंद्रपूरचे तापमान ४२ अंश सेल्सिअस वर पोहोचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.वाढत्या उन्हामुळे नागरिकांना त्रास झाल्यास तातडीने उपचार मिळावेत यासाठी जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेने रुग्णालयांमध्ये ‘कोल्ड रूम तयार केल्या आहेत. शहरात विविध ठिकाणी बॅनर लावून नागरिकांनी उन्हात जाताना कोणती काळजी घ्यावी, याचे मार्गदर्शन केले जात आहे. वाढत्या पाऱ्यामुळे दुपारी १२ ते ४ या वेळेत रस्ते ओस पडू लागले आहेत.

नागरिकांना प्रशासनाचे आवाहन
राज्यात एकीकडे वादळी वारे आणि पावसाचे सावट असताना दुसरीकडे तापमानाने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे नागरिकांनी कामाशिवाय उन्हात बाहेर पडू नये, पुरेसे पाणी प्यावे आणि उष्माघाताची लक्षणे (उदा. डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळणे) दिसताच डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!