
बार्शीचा ‘मुन्नाभाई’ गजाआड!; २० वर्षे खेळत होता रुग्णांच्या जीवाशी, बनावट डॉक्टरला पोलिसांनी केली अटक
बार्शी तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसताना तब्बल दोन दशके (२० वर्षे) दवाखाना थाटून रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शंकर मनोहर पाठक असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो स्वतःच्याच घरात लपून बसला असताना पोलिसांनी ही धडक कारवाई केली.

२० वर्षांचा बनाव आणि आरोग्य विभागाचा छापा

आरोपी शंकर पाठक हा उपळाई ठोंगे परिसरात गेल्या २० वर्षांपासून वैद्यकीय प्रॅक्टिस करत होता. मात्र, त्याच्याकडे कोणतीही कायदेशीर पदवी नसल्याची तक्रार आरोग्य विभागाला प्राप्त झाली होती. त्यानुसार आरोग्य विभागाने काही दिवसांपूर्वी त्याच्या क्लिनिकवर छापा टाकला. यावेळी त्याचे पितळ उघडे पडले आणि प्रशासनाने तातडीने क्लिनिक सील केले. मात्र, कारवाईची चाहूल लागताच पाठक तेथून पसार झाला होता.

स्वतःच्याच घरात लपला होता आरोपी
आरोग्य विभागाने गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. तो फरार झाल्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. दरम्यान, आरोपी आपल्या उपळाई ठोंगे येथील राहत्या घरातच लपून बसल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली.
अशी झाली मध्यरात्री फिल्मी स्टाईल कारवाई
माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला. पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र मंगरुळे, धनाजी केकान आणि पोलीस नाईक नागनाथ आंधळे यांच्या पथकाने मध्यरात्री त्याच्या घरावर छापा टाकला. संपूर्ण घराची झडती घेतल्यानंतर आरोपी घरातच दडून बसल्याचे आढळले. पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेऊन अटक केली.
प्रशासनाकडून तपास सुरू
एवढ्या मोठ्या कालावधीसाठी हा बोगस डॉक्टर प्रशासनाच्या नजरेतून कसा सुटला? त्याने आतापर्यंत किती रुग्णांच्या जीवाशी खेळ केला? याबाबत आता कसून चौकशी केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल धनाजी केकान करत आहेत.

