Latest Marathi News
Ganesh J GIF

ती’ सफर ठरली अखेरची… आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ ८०० फूट दरीत कोसळून ८ मित्रांची अकाली एक्झिट

महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला आहे. एक स्कॉर्पिओ गाडी तब्बल ८०० फूट खोल दरीत कोसळल्याने वाहनातील ८ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या धक्कादायक दुर्घटनेमुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही दुर्घटना रविवारी मध्यरात्री ते सोमवारी पहाटेच्या सुमारास कुंभरोशी परिसरापासून सुमारे ३ किमी अंतरावर पोलादपूर हद्दीत घडली.

अपघातग्रस्त स्कॉर्पिओ क्रमांक  MH 11 DN 2340 मधील प्रवाशांशी संपर्क होत नसल्याने घाबरलेल्या नातेवाईकांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. पोलिसांनी तात्काळ तांत्रिक माहिती आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे शोधमोहीम सुरू केली. तपासादरम्यान ही गाडी आंबेनळी घाटातील भीषण दरीत कोसळल्याचे समोर आले आणि सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली.

दरीत कोसळलेल्या ‘त्या’ ८ मित्रांची नावे समोर

अपघातग्रस्त वाहनातील तरुण हे सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवासी होते. प्रशासनाकडून अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी खालील तरुणांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती समोर आली आहे:

आसगाव (सातारा): रितेश राजेंद्र लोखंडे (वय २२), सुहास जितेंद्र लोखंडे (वय २०), महेश अनिल पवार (वय २५), आदित्य अशोक साळुंखे (वय २१)

मर्ढे (सातारा): करण आनंद शिंगटे (वय २१), निखिल अभिमन्यू शिंगटे (वय २५)

खटाव (सातारा): संदीप अशोक काटकर (वाहन चालक, वय ३७)

बोरगाव, चिपळूण (रत्नागिरी): अंश समीर चव्हाण (वय १९)

८०० फूट खोल दरी अन् घनदाट जंगल; बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक!

घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस, महसूल विभाग आणि स्थानिक ट्रेकर्स घटनास्थळी दाखल झाले. दरीची प्रचंड खोली, घनदाट जंगल, निसरडा उतार आणि रात्रीचा अंधार यामुळे रात्रीचे बचावकार्य अत्यंत कठीण झाले होते. मात्र, जीवाची पर्वा न करता बचाव पथकांनी दोरांच्या सहाय्याने दरीत उतरून वाहनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.या मोहिमेत प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स, सह्याद्री ट्रेकर्स आणि महाडची सिस्केप रेस्क्यू टीम अहोरात्र प्रयत्न करत आहे. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर एका तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून तो शवविच्छेदनासाठी पोलादपूर येथे पाठवण्यात आला आहे.

युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू; संपूर्ण जिल्हा सुन्न

सोमवारी सकाळपासूनच उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, पोलादपूरचे तहसीलदार कपील घोरपडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या उपस्थितीत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. घाटातील तीव्र वळणे, रात्रीचा प्रवास किंवा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. ऐन उमेदीच्या वयातील तरुण मुले काळाच्या पडद्याआड गेल्याने महाबळेश्वर, पोलादपूर, वाई, सातारा आणि खटाव परिसरातून तीव्र दुःख व्यक्त होत आहे. अधिकृत पंचनामा झाल्यानंतरच प्रशासनाकडून मृतांचा अंतिम आकडा आणि ओळख जाहीर केली जाईल.

हे देखील वाचा: (https://maharashtrakhabar.com/no-marches-no-meetings-in-pune-from-tomorrow-strict-curfew-for-the-next-2-weeks/)

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!