
महाराष्ट्राच्या राजकारणातून सध्या एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (SP) नेते आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आगामी अहिल्यानगर विधानपरिषद निवडणूक ते भाजपच्या तिकिटावर लढण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून, राजकीय वर्तुळात याने खळबळ उडवून दिली आहे.

जयंत पाटलांचा फोटो अन् चर्चांना उधाण

प्राजक्त तनपुरे यांनी सोशल मीडियावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा हात जोडलेला प्रोफाईल फोटो ठेवल्याने या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. हा फोटो म्हणजे तनपुरे यांनी शरद पवार गटाला रामराम ठोकण्याचे संकेत दिल्याचा अंदाज लावला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या गोटात तनपुरे यांच्या नावाची संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा सुरू होती, आता त्याला वेग आला आहे.

‘त्या’ एका फोनमुळे भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा?
याआधी पार पडलेल्या राहुरी पोटनिवडणुकीत प्राजक्त तनपुरे हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित मानले जात होते. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तनपुरे यांना एक फोन केला आणि त्यानंतर तनपुरे यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतली होती. फडणवीसांच्या या मध्यस्थीमुळेच आता तनपुरे यांना भाजपकडून विधानपरिषदेवर पाठवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दिल्लीतून होणार उमेदवारांची घोषणा; हालचालींना वेग
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. उमेदवारांचे नाव निश्चित करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आज दिल्लीला रवाना होणार आहेत.
दिल्ली दौऱ्यातील महत्त्वाच्या भेटी
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेणार.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महत्त्वाची बैठक होणार.या दौऱ्यात विधानपरिषदेचा जागावाटपाचा फॉर्म्युला आणि भाजप उमेदवारांच्या नावांची अंतिम यादी पक्षश्रेष्ठींकडे सोपवली जाईल. पुढील २ ते ३ दिवसांत दिल्लीतून भाजप उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असून, त्यात प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

