
नाशिकमधील गाजलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणासारखाच एक अत्यंत धक्कादायक, अघोरी आणि संतापजनक प्रकार सांगली जिल्ह्यातील विटा शहरात उघडकीस आला आहे. “तू मागच्या जन्मी नागिन होतीस आणि हा संकेत बाबा नाग होता, तुमच्या दोघांचे लग्न लावण्यासाठीच या जन्मी तुमचा जन्म झाला आहे,” अशी थाप मारून एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.या प्रकरणी विटा पोलिसांनी तिघा भोंदूबाबांविरुद्ध पोक्सो आणि जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. महेश मोहन बाबर (रा. भवानी माळ, विटा), संकेत संदीप निकम (रा. घोगाव, ता. पलूस, जि. सांगली) आणि सूरज उपाध्ये अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

‘कडेश्वर धाम’ आश्रमात सुरू होता अघोरी प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, विट्यातील पाटील वस्ती परिसरात गेल्या काही काळापासून ‘कडेश्वर धाम अध्यात्म संस्था’ नावाचा आश्रम सुरू आहे. हा आश्रम महेश बाबर, संकेत निकम आणि सूरज उपाध्ये हे तिघे चालवतात. हे तिघे स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे सांगून आश्रमात येणाऱ्या भाबड्या लोकांची आर्थिक, शारीरिक आणि मानसिक फसवणूक करत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. मागच्या आठवड्यातच एका महिलेच्या तक्रारीवरून या तिघांना विटा पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता एका अल्पवयीन मुलीच्या छळाचे हे गंभीर प्रकरण समोर आले आहे.

आजाराचा गैरफायदा घेऊन भोंदूगिरी
पीडित अल्पवयीन मुलीला काही काळापासून शारीरिक आणि पित्ताशयाचा त्रास होता. याच आजाराचा आणि तिच्या हतबलतेचा गैरफायदा संशयित आरोपी महेश बाबर आणि संकेत निकम यांनी घेतला. “संकेत निकम हा शंकर बाबा, महाकाल, बाळूमामा आणि चिले महाराज यांचा अवतार आहे,” असे त्यांनी पीडितेला आणि तिच्या कुटुंबीयांना भासवले. तसेच पीडित मुलीच्या शरीरात अंबाबाई देवीचा संचार येतो, असे सांगून तिला वेगवेगळ्या पूजा आणि अघोरी हवन करण्यास भाग पाडले.
मागच्या जन्मीची ‘नागिन’ सांगून अत्याचार!
अंधश्रद्धेचा कळस गाठत आरोपींनी पीडित मुलीला सांगितले की, “तू मागच्या जन्मीची नागिन होतीस आणि संकेत बाबा हा नाग होता. तुमच्या दोघांचे लग्न लावण्यासाठीच या जन्मी तुमचा जन्म झाला आहे.” या भोंदूगिरीच्या जाळ्यात ओढून मुख्य आरोपी संकेत निकम याने विटा येथील एका खोलीवर नेऊन त्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने वारंवार शारीरिक अत्याचार केला.
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी आणि ५ लाखांची लुट
या कृत्यात सामील असलेल्या सूरज उपाध्ये नावाच्या तिसऱ्या आरोपीने पीडित मुलीला तोंड न उघडण्याची धमकी दिली होती. “संकेत बाबा अंतर्ज्ञानाने सर्वकाही बघत आहेत, जर कोणाला काही सांगितले तर तुझे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेन,” अशी धमकी त्याने दिली.याशिवाय, आजार बरे करणे आणि पूजा-हवनाच्या नावाखाली संशयित आरोपी महेश बाबर आणि संकेत निकम यांनी पीडित मुलीच्या वडिलांकडून एकूण ४ लाख ५० हजार रुपये बँक खात्यावर आणि ५० हजार रुपये रोख अशी एकूण ५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
पीडितेचे धाडस; पोलिसांत गुन्हा दाखल
हा सर्व प्रकार आणि आर्थिक-शारीरिक छळ असह्य झाल्यानंतर पीडित मुलीने अखेर धाडस दाखवून विटा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि रीतसर फिर्याद दिली. विटा पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS), पोक्सो कायदा (लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा) आणि महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध कायदा २०१३ चे कलम ३ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

