Latest Marathi News
Ganesh J GIF

तळपत्या उन्हात मेलो तरी चालेल…”; मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम

मराठा आरक्षणाच्या लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज, ३० मे रोजी सकाळी आंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. ऐन उन्हाळ्यात सुरू झालेल्या या उपोषणासाठी आंतरवालीत मराठा समाजाची अलोट गर्दी झाली आहे. उपोषण सुरू करण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील कमालीचे भावनिक झाले होते, तर त्यांच्या भूमिकेमुळे उपस्थित जनसमुदायाच्या डोळ्यातून अश्रू आले.

“इतकं प्रेम कोणालाच मिळणार नाही” – जरांगे पाटील भावूक

उपोषणस्थळी झालेली गर्दी पाहून मनोज जरांगे पाटील यांचाही कंठ दाटून आला. ते म्हणाले, “लोकांचा माझ्यावर खूप जीव आहे हे मला माहिती आहे. आज आंतरवालीत उभं राहायला जागा नाही, ते पाहून माझ्याही डोळ्यात पाणी आलं. समाजाला माझ्याकडून आशा आहेत. पण सरकार मराठा समाजावर वारंवार अन्याय करत आहे. मी माझ्या समाजासाठी, लेकराबाळांसाठी मरायला तयार आहे, पण मी आता मागे हटणार नाही.”ते पुढे म्हणाले, “मला इथे गोळ्या घालून मारलं किंवा या तळपत्या उन्हात तडफडून मरू दिलं, तरी मी मागे हटणार नाही. मी सरकारवर अविश्वास दाखवत नाही, त्यांचे शिष्टमंडळ येईलच. पण मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे.”

केवळ आश्वासन नको, थेट आदेश द्या; जरांगे पाटलांच्या ३ प्रमुख मागण्या

मनोज जरांगे यांनी उपोषणाच्या पहिल्याच दिवशी सरकारसमोर केवळ मसुदा किंवा आश्वासन नको, तर प्रत्यक्ष आदेश काढण्याची मागणी करत खालील ३ प्रमुख मागण्या मांडल्या आहेत:

१. ५८ लाख कुणबी नोंदींची अंमलबजावणी
शासनाने शोधलेल्या ५८ लाख मराठा-कुणबी नोंदींच्या आधारे संबंधित नागरिकांना तातडीने कुणबी प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र (Validity) देण्यात यावे. प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई किंवा निलंबनाची तरतूद असावी.

२. हैदराबाद गॅझेटच्या आधारे प्रमाणपत्र
हैदराबाद गॅझेट आणि स्थानिक चौकशी अहवालाच्या आधारे अर्ज करणाऱ्या पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र आणि वैधता दिली जावी. याचा प्रत्यक्ष शासन आदेश जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवावा.

३. सातारा संस्थान संदर्भातील जीआर
सातारा संस्थानाशी संबंधित शासन निर्णय (GR) काढण्यास सरकारला कोणतीही अडचण नाही, त्यामुळे तो तातडीने काढावा.

सरकारबद्दल काय म्हणाले जरांगे पाटील?

“सरकार येत राहील, जात राहील, चर्चाही होत राहील. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठका सुरू असल्याची माहिती मला आहे. मात्र, आता केवळ चर्चा किंवा मसुदा नको, तर प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे आदेश सरकारने काढावेत,” अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.सध्या आंतरवाली सराटीत कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष पुन्हा एकदा या आंदोलनाकडे लागले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!