Latest Marathi News
Ganesh J GIF

नसरापूर चिमुरडीवरील अत्याचार-हत्या खटला; सुनावणीच्या पहिल्याच दिवशी ५ महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष

भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या क्रूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील खटल्याला गती आली आहे. पुण्याच्या विशेष न्यायालयात शुक्रवारपासून (२९ मे) या खटल्याच्या सुनावणीला थेट सुरुवात झाली. सुनावणीच्या पहिल्याच दिवशी न्यायालयाने अत्यंत वेगाने कामकाज करत ५ महत्त्वाच्या साक्षीदारांची सरतपासणी आणि उलटतपासणी पूर्ण केली आहे.

यामध्ये आरोपीला मयत बालिकेसोबत शेवटचे पाहणाऱ्या दोन अत्यंत महत्त्वाच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचा समावेश आहे. आज, शनिवारी (३० मे) सरकारी पक्षाकडून या प्रकरणातील सहाव्या साक्षीदाराची साक्ष नोंदविली जाणार आहे.या खटल्यातील ६५ वर्षीय मुख्य आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (रा. भोर) याच्या विरोधात राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

पुरावा नष्ट केल्याचे कलम वाढवण्याची मागणी

विशेष न्यायाधीश एस.आर. साळुंखे यांच्या न्यायालयात गुरुवारी आरोपीविरोधात आरोप निश्चित करण्यात आले होते. दरम्यान, नराधम आरोपीने गुन्हा केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले असून, आरोपपत्रात पुरावा नष्ट केल्याचे कलम वाढविण्यात यावे, असा लेखी अर्ज सरकार पक्षातर्फे न्यायालयात सादर करण्यात आला आहे.

आई-वडिलांसह प्रत्यक्षदर्शींची साक्ष, कोर्टात सीसीटीव्ही सादर

या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण ८२ साक्षीदारांची यादी सादर करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर यांनी पहिल्या सहा साक्षीदारांची साक्ष न्यायालयासमोर नोंदविण्यास सुरुवात केली, तर बचाव पक्षातर्फे ॲड. हिंमतराव सूर्यवंशी यांनी त्यांची उलटतपासणी घेतली.

न्यायालयासमोर पहिल्या दिवशी खालील महत्त्वाचे पुरावे आणि साक्ष नोंदवण्यात आल्या. पीडितेची आई (जी या प्रकरणातील तक्रारदार आहे) आणि वडिलांची साक्ष नोंदवली गेली.आरोपीने चिमुरडीचे अपहरण केल्यानंतर तिचा शोध घेणाऱ्या तीन ग्रामस्थांनी साक्ष दिली. यातील दोघांनी पीडितेला आरोपीसोबत शेवटचे जिवंत पाहिले होते.घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज कोर्टात सादर करण्यात आले. या चित्रीकरणात पीडितेला घेऊन जाणाऱ्या ६५ वर्षीय आरोपीला साक्षीदारांनी कोर्टासमोर स्पष्टपणे ओळखले.पीडितेच्या मृत्यूच्या कारणांची चौकशी करणारा इन्क्वेस्ट पंचनामा, जन्मदाखला आणि एफआयआरची प्रत कोर्टासमोर ठेवण्यात आली.

“या खटल्याला ‘लँडमार्क केस’ बनवणार” – ॲड. अजय मिसर

या संवेदनशील प्रकरणावर बोलताना विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर यांनी सरकार पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “या खटल्यात आमचा मुख्य उद्देश हाच आहे की, लवकरात लवकर ही सुनावणी पूर्ण करून या प्रकरणाला एक ‘लँडमार्क केस’ (दिशादर्शक खटला) बनवणे. पीडित चिमुरडीला आणि तिच्या वेदनेतून जाणाऱ्या कुटुंबीयांना अत्यंत कमी वेळात कठोर न्याय मिळवून देणे आणि अशा नराधमांना फाशीसारखी कठोर शिक्षा देऊन समाजात एक कडक संदेश देणे, हाच सरकार पक्षाचा मुख्य हेतू आहे.”या प्रकरणाच्या जलद सुनावणीमुळे संपूर्ण भोर तालुक्यासह पुणे जिल्ह्याचे लक्ष या खटल्याच्या निकालाकडे लागले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!