Latest Marathi News
Ganesh J GIF

दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल

बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. सोशल मीडियावर रील बनवण्याच्या नादात एका तरुणाला थेट मृत्यूच्या धमकीचा सामना करावा लागल्याचा आरोप झाला आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

हॉटेलमध्ये रील बनवण्यावरून झालेल्या वादात, धनंजय देशमुखांनी आपल्या अंगरक्षकाची पिस्तूल काढून एका तरुणाच्या डोक्याला लावल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे.याप्रकरणी समाधान खिंडकर नावाच्या तरुणाने बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. समाधान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते आणि त्यांचे मित्र एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्याच हॉटेलमध्ये धनंजय देशमुख हे सोशल मीडियावरील एका प्रसिद्ध सेलिब्रिटीसोबत (प्रसिद्ध व्यक्तीसोबत) बसलेले होते.

तिथे उपस्थित असलेल्या समाधान खिंडकर यांनी आपला मोबाईल काढून एक रील बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा रील बनवणं धनंजय देशमुख यांच्या अंगरक्षकाला आवडलं नाही आणि त्याने समाधान यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. “माझा मोबाईल का हिसकावलास?” असा जाब जेव्हा समाधान खिंडकर यांनी अंगरक्षकाला विचारला, तेव्हा तिथे मोठा वाद निर्माण झाला.

समाधान यांचा आरोप आहे की, हा वाद सुरू असतानाच धनंजय देशमुख तिथे धावत आले. त्यांनी आपल्या अंगरक्षकाकडील पिस्तूल स्वतःच्या हातात घेतली आणि थेट समाधान यांच्या डोक्याला लावली. एवढंच नाही तर “आता तुला जिवंत ठेवणार नाही…” अशी थेट धमकी दिल्याचेही समाधान खिंडकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत बीड ग्रामीण पोलिसांनी धनंजय देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. मात्र, दुसरीकडे धनंजय देशमुख यांनी हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. “हॉटेलमध्ये असा कुठलाही प्रकार घडलेला नाही, माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे आहेत,” असे स्पष्टीकरण धनंजय देशमुख यांनी दिले आहे.

आजकाल रील बनवण्याची क्रेझ तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे, पण याच रीलमुळे बीडमध्ये थेट पिस्तूल निघाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता या प्रकरणात तथ्य काय आहे, हे पोलिसांच्या तपासानंतरच समोर येईल.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!