
पार्थ पवारांकडून मित्रासाठी थेट ‘पॉवर गेम’!; माजी खासदार संजय काकडेंचे सुपुत्र विक्रम काकडे राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या रिंगणात ?
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे सध्या पुण्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ही जागा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) सुटल्यानंतर, इथे उमेदवारी कोणाला मिळणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र, आता या जागेवरून राष्ट्रवादीत खासदार पार्थ पवार यांचीच ‘पॉवर’ चालत असल्याचं स्पष्ट झालंय. अनेक बड्या दिग्गजांना मागे टाकत पार्थ पवार यांनी एका चकित करणाऱ्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे.

पुण्याच्या या जागेसाठी राष्ट्रवादीकडे इच्छुकांची मोठी जत्रा भरली होती. माजी आमदार सुनील टिंगरे, विलास लांडे, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष योगेश बहल, दीपक मानकर, नाना काटे, संदीप वाघिरे, अमोल बालवडकर आणि रणजित शिवतरे यांसारखे मातब्बर नेते शर्यतीत होते.शनिवारी खासदार पार्थ पवार पुण्यात दाखल झाल्यानंतर, भोसलेनगर येथील त्यांच्या निवासस्थानी जवळपास १७ ते १८ इच्छुकांनी त्यांची भेट घेतली. आपणच कसे ‘सक्षम’ उमेदवार आहोत, हे पटवून देण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करत होता. मध्यरात्रीपर्यंत ही खलबतं सुरू होती. मात्र, पार्थ पवारांनी या सर्व दिग्गजांना डावलून विक्रम काकडे यांच्या नावाचा आग्रह धरला आणि त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केल्याची खात्रीशीर माहिती आहे.

विशेष म्हणजे, मागील विधान परिषदेच्या निवडणुकीतही पार्थ पवार हे विक्रम काकडे यांच्या उमेदवारीसाठी प्रचंड आग्रही होते. मात्र, ऐनवेळी राजकीय गणिते बदलली आणि राष्ट्रवादीने झिशान सिद्दिकी यांना उमेदवारी दिली होती. पण यावेळी मात्र पार्थ पवारांनी आपल्या या मित्रासाठी पूर्ण ताकद लावल्याचं दिसतंय.तर विक्रम काकडे हे पुण्याचे प्रसिद्ध उद्योजक आणि माजी खासदार संजय काकडे यांचे सुपुत्र आहेत. ते ‘विक्रम काकडे कन्स्ट्रक्शन’ या नामांकित कंपनीचे संचालक असून, राष्ट्रवादीचे नेते खासदार पार्थ पवार यांचे अत्यंत निकटचे आणि घनिष्ठ मित्र मानले जातात.

येत्या काही तासांतच या उमेदवारीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. पार्थ पवारांच्या या ‘फ्रेंडशिप प्लस पॉवर’ गेममुळे पुण्यातील अनेक प्रस्थापित आणि ज्येष्ठ नेत्यांचे पत्ते कट झाले आहेत. आता पार्थ पवारांचा हा निर्णय पुणे राष्ट्रवादीत नवीन वाद निर्माण करणार की काकडेंच्या रूपाने राष्ट्रवादी बाजी मारणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

