
“मुंबईत रस्त्यावरील नमाज पठण तातडीने बंद करा!” ; किरीट सोमय्यांचे पोलीस आणि महापालिका आयुक्तांना पत्र
मुंबई परिसरातील रेल्वे स्थानकांच्या बाहेर आणि मुख्य रस्त्यांवर होणाऱ्या नमाज पठणामुळे वाहतूक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन व्यवस्थेत मोठा अडथळा निर्माण होत असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी मुंबई महापालिका (BMC) आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्तांना थेट पत्र लिहून रस्त्यावरील नमाज पठण तातडीने बंद करण्याची आग्रही मागणी केली आहे. या पत्रामुळे आता मुंबईत नवा राजकीय आणि सामाजिक वाद उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दर शुक्रवारी वाहतूक कोलमडते; सोमय्यांचा आरोप

किरीट सोमय्या यांनी आपल्या पत्रात प्रामुख्याने मांडलेल्या मुद्द्यांनुसार, दर शुक्रवारी भर दुपारी, कामकाजाचा (Working Day) दिवस असतानाही रेल्वे स्थानकांच्या बाहेर आणि वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावर नमाज पठण केले जाते. यामुळे सुमारे एक तास संपूर्ण भागातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडते आणि सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. “कोणत्याही एका समाजातील काही लोकांना अशा प्रकारे भरदिवसा सर्वसामान्यांच्या दैनंदिन व्यवस्थेत आणि कामात अडथळा आणण्याचा अधिकार देता येणार नाही,” असे सोमय्या यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे म्हटले आहे.

भविष्यात ‘दादागिरी’ वाढण्याची भीती
सध्या काही मर्यादित ठिकाणी होत असलेल्या या प्रकारांचे उदाहरण देत, भविष्यात संपूर्ण मुंबई शहरात धर्माच्या नावाने अशीच ‘दादागिरी’ सुरू होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. काही विशिष्ट प्रवृत्तीचे लोक ‘नमाज हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे’ अशा अविर्भावात वागत असल्याचा थेट आरोपही त्यांनी या पत्रात केला आहे.
न्यायालयाच्या नियमांचा दाखला
पत्रात किरीट सोमय्या यांनी न्यायालयाच्या नियमांचा दाखला देत प्रशासनाला सवाल विचारला आहे. ते म्हणाले, “खेळाची मैदाने, उद्याने किंवा खुल्या जागांवर धार्मिक, सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यावर न्यायालयाचे स्पष्ट निर्बंध आहेत. असे असताना रेल्वे स्टेशनबाहेर किंवा मुख्य चौकात रस्त्यावर नमाज पठण कसं करू दिलं जातं?” जर आज इथे परवानगी दिली, तर उद्या इतर ठिकाणीही अशाच मागण्या केल्या जातील, याकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.प्रशासनाला कायदेशीर जबाबदारीची आठवण: रस्त्यावरील हे नमाज पठण रोखणे ही मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई वाहतूक पोलीस सहआयुक्त, मुंबई महापालिका आयुक्त आणि मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांची कायदेशीर जबाबदारी आहे, असे सोमय्या यांनी पत्रात नमूद केले.
तातडीने कारवाईची मागणी
मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि सर्वसामान्यांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी प्रशासनाने या प्रकारांवर तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. आता या पत्रावर मुंबई पोलीस आणि महापालिका प्रशासन काय पावले उचलणार आणि यावर इतर राजकीय पक्षांकडून काय प्रतिक्रिया येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

