Latest Marathi News
Ganesh J GIF

अभिजीत दिपकेंच्या दिल्ली आंदोलनावर मनोज जरांगे पाटलांचे मोठे वक्तव्य

राजकीय वर्तुळात सध्या “कॉकरोच जनता पार्टी”चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या प्रस्तावित आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू आहे. अभिजीत दिपके हे परदेशातून भारतात दाखल होणार असून येत्या ६ जून रोजी दिल्लीत मोठे आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. या आंदोलनासाठी त्यांनी तरुणांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले असून, दिल्लीत कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर सरकार काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या संपूर्ण घडामोडींवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत मोठे आणि सूचक भाष्य केले आहे.

“त्या पोरांनी चांगलं वातावरण पेटवलंय!”

अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाचा संदर्भ देत मनोज जरांगे पाटील म्हणाले, “त्या पोरांनी चांगलं वातावरण पेटवलं आहे, ही जनतेमधील खदखद आणि असंतोष आहे.” पुढे बोलताना त्यांनी सरकारला सल्ला दिला की, सरकारने लोकांच्या भावना वेळीच समजून घेतल्या पाहिजेत. दादागिरी आणि पैशाच्या जोरावर फार काळ परिस्थिती नियंत्रणात ठेवता येत नाही, त्यामुळे लोकांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने दुर्लक्ष करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकार कोणाचेही असो, काम न केल्यास कठोर भूमिका!

मनोज जरांगे पाटील यांनी केवळ सध्याच्या सरकारवरच नाही, तर आगामी काळातील संभाव्य समीकरणांवरूनही दोन्ही आघाड्यांना सुनावले आहे. ते म्हणाले, “सरकार कोणाचेही असू द्या, महायुतीचं असू द्या नाही तर महाविकास आघाडीचं असू द्या, काम नाही केल्यावर आम्ही कठोर भूमिका घेणार!” केवळ एक आदेश काढायचा आणि लोकांना तात्पुरते समाधानी करायचे, मात्र बाकीचे प्रश्न लटकवून ठेवायचे, हे आता चालणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना थेट घरी पाठवा!

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रशासकीय संथ गतीबद्दल संताप व्यक्त करताना जरांगे पाटील म्हणाले, “५८ लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत, त्यांना तातडीने प्रमाणपत्र आणि व्हॅलिडीटी द्या, याचे कडक आदेश सरकारने काढले पाहिजेत. जर अधिकारी यात टाळाटाळ करत असतील, तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांना कणाकण घरी पाठवलं पाहिजे. सरकारपेक्षा अधिकारी मोठे झाले आहेत का?” असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला.शासकीय कामकाजात पारदर्शकता असावी आणि घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी जलद गतीने व्हावी, अशी आग्रही मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.

६ जूनच्या आंदोलनाकडे देशाचे लक्ष

अभिजीत दिपके यांच्या ६ जूनच्या दिल्लीतील आंदोलनाला जरांगे पाटील यांनी एकप्रकारे पाठिंबा दर्शवत जनतेमधील असंतोष अधोरेखित केला आहे. दुसरीकडे, ५८ लाख नोंदींना प्रमाणपत्र देण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ६ जून रोजी दिल्लीत काय घडणार आणि सरकार यावर काय पावले उचलणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!