Latest Marathi News
Ganesh J GIF

६२ लाख महिलांची ई-केवायसी प्रलंबित; अपात्र किंवा लाभ स्थगित झालेल्या ‘लाडक्या बहिणींची’ पुन्हा होणार पडताळणी!

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. या योजनेतून कोणत्याही पात्र महिलेचा अर्ज बाद करण्यात आलेला नाही, अशी ग्वाही राज्याच्या महिला व बाल विकासमंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. सोशल मीडियाद्वारे राज्यातील महिलांशी संवाद साधताना त्यांनी अपात्र किंवा लाभ स्थगित झालेल्या महिलांच्या अर्जांची पुन्हा पडताळणी केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

६२ लाख महिलांची ई-केवायसी अपूर्ण; निकषांची भीती?

मिळालेल्या माहितीनुसार, योजनेअंतर्गत अपात्र ठरलेल्या ८१ लाख महिलांपैकी तब्बल ६२ लाख लाडक्या बहिणींची ई-केवायसी (e-KYC) झालेली नाही. अनेक महिलांनी सरकारच्या कडक निकषांना घाबरूनच ही केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर, पात्र असलेल्या लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा केवायसी पडताळणी केली जाईल, असे मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

लाडक्या बहिणींचा लाभ का स्थगित झाला?

अदिती तटकरे यांनी अर्ज स्थगित किंवा अपात्र ठरण्यामागची प्रमुख कारणे स्पष्ट केली आहेत. वयाचे आणि उत्पन्नाचे निकष पूर्ण न करणाऱ्या अर्जदारांची माहिती संबंधित विभागांकडून प्राप्त झाली आहे. ज्या अर्जदारांच्या नावावर चारचाकी किंवा इतर वाहन नोंदणी आहे, त्यांची माहिती आरटीओ विभागाकडून मिळाली आहे. काही अर्जदार शासनाच्या इतर आर्थिक लाभ देणाऱ्या योजनांचेही लाभार्थी असल्याचे निदर्शनास आले आहे. विहित कालावधीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे अनेक महिलांचा लाभ तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे.

८० लाख महिलांचा लाभ बंद; सध्या १.६८ कोटींनाच मानधन

प्रशासकीय छाननी आणि ई-केवायसी अपूर्ण असल्यामुळे महाराष्ट्रातील तब्बल ८० लाख महिलांचे लाभ सध्या बंद करण्यात आले आहेत. कागदपत्रांच्या आणि केवायसीच्या अचूक छाननीनंतर आता राज्यातील सुमारे १.६८ कोटी महिलांनाच दरमहा १५०० रुपयांचा लाभ मिळत आहे.

“एकाही बहिणीवर अन्याय होणार नाही”

राज्यातील एकाही पात्र लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही, ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची स्पष्ट भूमिका असल्याचे तटकरे यांनी सांगितले. महिला व बालविकास विभाग यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील असून सर्व पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे, असेही त्या म्हणाल्या.

महिलांनी तातडीने ‘या’ विभागाशी संपर्क साधावा!

ज्या महिलांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, ज्यांच्या नावावर कोणतीही वाहन नोंदणी नाही, तरीही त्यांचा लाभ स्थगित झाला आहे; किंवा ज्यांचा इतर योजनांमुळे लाभ थांबला आहे, अशा महिलांसाठी मंत्र्यांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे. अशा सर्व महिलांनी तातडीने महिला व बालविकास विभागाकडे संपर्क साधावा. या सर्व प्रकरणांची विभागाकडून पुन्हा एकदा सखोल पडताळणी केली जाईल, अशी ग्वाही मंत्र्यांनी दिली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!