
देशातील सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा आणखी एक मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. नुकतीच घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Cylinder) किमतीत वाढ झाली असतानाच, येणाऱ्या काळात गॅस आणि इंधन आणखी महाग होणार असल्याचे संकेत खुद्द केंद्र सरकारने दिले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील भू-राजकीय तणाव आणि जागतिक पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे हा नाईलाज झाल्याचे सरकारने म्हटले आहे.

गॅस सिलेंडरचे दर वाढण्याचे कारण काय?

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी वाढत्या महागाईवर सरकारची बाजू स्पष्ट करताना जागतिक संकटाचा दाखला दिला. ते म्हणाले “गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्यामुळे आम्हालाही अत्यंत दुःख आणि खेद आहे. मात्र, यावर केवळ टीका करण्यापूर्वी लोकांनी जगातील सद्यस्थिती समजून घेतली पाहिजे. सध्या संपूर्ण जग गंभीर संकटाचा सामना करत आहे. जगभरात मालाची वाहतूक आणि पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.”

मंत्र्यांनी पुढे स्पष्ट केले की, एलपीजी गॅस आता अत्यंत मर्यादित ठिकाणांवरून उपलब्ध होत आहे, ज्यामुळे गॅसची मूळ किंमत वाढली आहे. तसेच, माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी आता तब्बल ४० ते ४५ दिवस लागत आहेत. या वाढलेल्या वेळामुळे वाहतुकीचा खर्च आणि विम्याचा खर्च कमालीचा वाढला असून, आगामी काळात पेट्रोल-डिझेलसह गॅस सिलेंडरचे दर आणखी वाढू शकतात, असे संकेत त्यांनी दिले.
मुंबईत सिलेंडर ९४२ रुपयांवर!
नुकतंच ७ जून रोजी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत प्रति सिलेंडर २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या ताज्या दरवाढीनंतर आता मुंबईमध्ये १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ९४२ रुपयांवर पोहोचली आहे.यापूर्वी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरांमध्येही मोठी वाढ झाली होती, ज्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि केटरर्स आधीच अडचणीत आले आहेत. आता घरगुती गॅस सिलिंडरचे दर पुन्हा वाढणार असल्याने गृहिणींचे बजेट पूर्णपणे कोलमडणार असल्याचे चित्र आहे.

