
पुण्यातील कुप्रसिद्ध आंदेकर आणि सोमनाथ गायकवाड टोळीतील वर्चस्वाचा वाद आता टोकाचा शिगेला पोहोचला आहे. तुरुंगात असलेल्या कृष्णा आंदेकर आणि त्याच्या भाच्यांना न्यायालयात नेत असताना, पोलीस वाहनाचा (पोलीस व्हॅन) पाठलाग करून त्यांच्यावर भरदिवसा गोळीबार करण्याचा एक थरारक कट रचण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Crime Branch) वेळेत कारवाई करत हा मोठा कट उधळून लावला आहे. सोमनाथ गायकवाडचा जवळचा साथीदार सुरज ठोंबरे याने हा कट रचल्याचे उघड झाले असून, याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात सूरज ठोंबरेसह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट दोनमधील पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी खालील आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत:
१. सूरज अशोक ठोंबरे (वय २४, रा. नाना पेठ) – मुख्य सूत्रधार
२. मानव शरद ढमाले (वय २४, रा. धनकवडी)
३. वेदांत रोहित सावंत (वय २१, रा. धनकवडी)
४. धीरज लखारा (रा. धनकवडी)
५. अथर्व दत्तात्रय खोपडे (वय २१, रा. गुजरवाडी, कात्रज) आणि त्यांच्या इतर साथीदारांचा समावेश आहे.

पोलीस व्हॅनचा पाठलाग करून हल्ल्याचा होता डाव!

आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर, नातू स्वराज वाडेकर आणि तुषार वाडेकर सध्या नंदूरबार कारागृहात आहेत. त्यांच्यावर ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी कृष्णा आंदेकर, स्वराज वाडेकर आणि तुषार वाडेकर यांना न्यायालयीन कामकाजासाठी नंदूरबार कारागृहातून पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयात आणण्यात आले होते. न्यायालयातील सुनावणी आणि पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा पोलीस वाहनातून नंदूरबार कारागृहात रवाना करण्यात येणार होते. याच प्रवासा दरम्यान पोलीस वाहनाचा पाठलाग करून कृष्णा आंदेकर आणि त्याच्या भाच्यांवर बेछूट गोळीबार करून त्यांचा गेम करण्याचा कट सूरज ठोंबरे आणि त्याच्या टोळीने रचला होता. मात्र, पोलिसांना याची वेळीच कुणकुण लागल्याने हा मोठा अनर्थ टळला.
आंदेकर विरुद्ध गायकवाड टोळीयुद्धाचा रक्तरंजित इतिहास
पुण्यातील नाना पेठ परिसरात वर्चस्व राखण्यासाठी या दोन्ही टोळ्यांमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक रक्ताचे पाट वाहले आहेत. दोन वर्षांपूर्वी टोळी युद्धाच्या वादातून माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा नाना पेठेतील डोके तालमीजवळ सोमनाथ गायकवाड टोळीतील गुंडांनी निर्घृण खून केला होता.वनराज आंदेकरांच्या खुनाचा सूड उगवण्यासाठी टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर याच्या सांगण्यावरून आयुष कोमकर आणि गणेश काळे यांचे खून करण्यात आले. दोन महिन्यांपूर्वीच पुणे-सातारा रस्त्यावर अक्षय काळे याच्यावरही गोळीबार करण्यात आला होता.
या सलग झालेल्या गुन्हेगारी घटनांमुळे पुणे पोलिसांनी आंदेकर गँगला जेरबंद करून थेट नंदूरबार जेलमध्ये पाठवले होते. मात्र, तरीही सोमनाथ गायकवाड टोळीचा आक्रस्ताळेपणा कमी झालेला नाही, हेच या ताज्या घटनेवरून स्पष्ट होत आहे. या घटनेमुळे पुणे शहर आणि विशेषतः नाना पेठ परिसरात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

