
शिक्षक भरतीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय!; ‘सेमी इंग्रजी’साठी पात्रतेच्या अटी शिथिल; रिक्त पदे भरणार
राज्यातील पवित्र संकेतस्थळामार्फत राबवल्या जाणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेबाबत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि उमेदवारांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सेमी इंग्रजी शाळांमधील शिक्षक भरतीसाठी पात्रतेच्या अटींमध्ये सुधारणा करण्यात आली असून, शिक्षण विभागाने याबाबतचे अधिकृत शुद्धिपत्रक प्रसिद्ध केले आहे. या नव्या सुधारणेमुळे डी.एड किंवा बी.एड (व्यावसायिक अर्हता) इंग्रजी माध्यमातून पूर्ण न केलेल्या, पण ठराविक शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांसाठी सेमी इंग्रजी शाळांमध्ये शिक्षक होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

पात्रता अटींमध्ये नेमकी काय शिथिलता दिली?

नवीन निर्णयानुसार, ज्या उमेदवारांनी आपली व्यावसायिक अर्हता (डी.एड/बी.एड) इंग्रजी माध्यमातून पूर्ण केलेली नाही, मात्र खालीलपैकी कोणतीही एक पात्रता धारण केली आहे, अशा उमेदवारांना आता पदभरतीसाठी पात्र समजले जाईल:

बारावी (विज्ञान शाखा – Science) उत्तीर्ण असलेले उमेदवार.
बी.ए. (B.A.) किंवा एम.ए. (M.A.) – इंग्रजी विषयातून पदवी/पदव्युत्तर पदवी घेतलेले उमेदवार.
बी.एस्सी. (B.Sc.) किंवा एम.एस्सी. (M.Sc.) पदवी असलेले उमेदवार.
निर्णय घेण्याची वेळ का आली?
शिक्षणाचा अधिकार कायदा (RTE 2009) आणि १३ फेब्रुवारी २०१३ च्या शासन निर्णयानुसार, सेमी इंग्रजी शाळांमधील शिक्षकांसाठी व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा इंग्रजी माध्यमातून अनिवार्य करण्यात आली होती. मात्र, या कडक अटींमुळे आवश्यक पात्रता असलेले उमेदवार पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नव्हते आणि सेमी इंग्रजी शाळांमधील अनेक पदे वर्षानुवर्षे रिक्त राहत होती. हीच अडचण दूर करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सरकारने हा महत्त्वपूर्ण बदल केला आहे.
शाळांचे माध्यम आणि उमेदवारी कशी ठरणार?
इयत्ता पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी, आणि नववी-दहावी या गटांतील सेमी इंग्रजी वर्गांसाठी शिक्षक निवडताना खालील निकष लावले जातील. उमेदवाराने दहावीची परीक्षा ज्या माध्यमातून (उदा. मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड) उत्तीर्ण केली आहे, ते माध्यम विचारात घेतले जाईल. किंवा उमेदवाराने दहावीची परीक्षा जी ‘द्वितीय भाषा’ घेऊन उत्तीर्ण केली आहे, त्या माध्यमाच्या शाळेसाठी त्याची उमेदवारी विचारात घेतली जाईल.
पहिली ते दहावीच्या सेमी इंग्रजी विषयांसाठी मूळ नियम म्हणून इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक अर्हता पूर्ण करणे आवश्यकच राहील. मात्र, जर संबंधित सामाजिक प्रवर्गातून (Category) असा उमेदवार उपलब्ध झाला नाही, तर रिक्त राहिलेल्या जागांसाठी नव्याने जाहिरात दिली जाईल.या नवीन जाहिरातीमध्ये वर नमूद केलेल्या शैक्षणिक पात्रता असणाऱ्या पण इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक अर्हता नसणाऱ्या उमेदवारांनाही अर्ज करण्याची मुभा दिली जाईल.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती प्रक्रियेला गती मिळणार असून, विज्ञान आणि इंग्रजी भाषेची पार्श्वभूमी असलेल्या हजारो डी.एड, बी.एड धारक उमेदवारांना मोठा फायदा होणार आहे.

