
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्याण न्यायालयाने समन्स बजावले आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कल्याण लोकसभा मतदारसंघात घडलेल्या एका कथित बदनामी प्रकरणी न्यायालयाने हे समन्स जारी केले असून, उद्धव ठाकरे यांना ५ ऑगस्ट रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तब्बल १७ वर्षांपूर्वीच्या या जुन्या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

नेमके प्रकरण काय आहे?

हे प्रकरण २००९ च्या लोकसभा निवडणुकीच्या काळातील आहे. त्यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे आणि शिवसेनेचे उमेदवार आनंद परांजपे यांच्यात थेट लढत झाली होती.

या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, तत्कालीन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी डोंबिवली येथे एका जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेत उद्धव ठाकरे यांनी वसंत डावखरे यांचा एक व्हिडिओ सार्वजनिकरित्या पडद्यावर दाखवला होता. या व्हिडिओमध्ये वसंत डावखरे हे कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांची भीती न बाळगता प्रयत्न करण्याचे आवाहन करत असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. या व्हिडिओमुळे त्यावेळी मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता.
व्हिडिओ ‘मॉर्फ’ केल्याचा होता आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांनी शिवसेनेचे सर्व दावे फेटाळून लावले होते. हा व्हिडिओ पूर्णपणे ‘मॉर्फ’ (संपादित) करण्यात आला असून, त्यातील मजकूर निवडक पद्धतीने एडिट करून आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोप डावखरे यांनी केला होता. दुसरीकडे, शिवसेनेने हा व्हिडिओ अस्सल असल्याचा दावा केला होता आणि या प्रकरणाची तक्रार थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडे करण्याची भूमिका घेतली होती. राजकीय वाद वाढल्यानंतर वसंत डावखरे यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यांनी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांच्याविरोधात न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला.
तक्रारदाराच्या निधनानंतर आता पुढे काय होणार?
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, मुख्य तक्रारदार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांचे निधन झाले आहे. त्यामुळे आता या खटल्याची पुढील कायदेशीर दिशा काय असेल, याबाबत कायदेतज्ज्ञांमध्ये आणि राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या प्रकरणी डावखरे कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका किंवा प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यांच्या भूमिकेवर आणि न्यायालयातील पुढील सुनावणीवरच या खटल्याचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

