Latest Marathi News
Ganesh J GIF

‘टीईटी’ उत्तीर्ण गुरुजींच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा; शालेय शिक्षण विभागाचा मोठा बदल, नवे वेळापत्रक जाहीर

राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असलेल्या हजारो शिक्षकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांच्या पदोन्नतीबाबत (Teacher Promotion) पूर्वीच्या नियमावलीत मोठा बदल केला असून ‘टीईटी’ (TET) उत्तीर्ण गुरुजींच्या पदोन्नतीचा मार्ग अखेर सुकर केला आहे. शालेय शिक्षण विभागाने यापूर्वी १४ मे रोजी जारी केलेले जुने पत्र पूर्णपणे रद्द केले असून, चालू आणि आगामी वर्षांतील पदोन्नतीची प्रक्रिया वेळेत आणि अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी नवीन सुधारित नियमावली आणि वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केले आहे.

नियमात नेमका काय बदल झाला?

जुना नियम: जुन्या निर्णयानुसार, १ सप्टेंबर २०२५ पूर्वी टीईटी उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांनाच पदोन्नती देण्याचा नियम होता. आता यात मोठी सुधारणा करण्यात आली असून, दरवर्षी १ ऑगस्टपर्यंत टीईटी उत्तीर्ण होणाऱ्या शिक्षकांना पदोन्नतीचा थेट लाभ मिळणार आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पदोन्नती समितीची बैठक आयोजित केली जाईल. या बैठकीच्या तारखेपर्यंत संबंधित उमेदवाराचा सेवा कालावधी, टीईटी, सीटीईटी आणि इतर आवश्यक शैक्षणिक पात्रता विचारात घेऊन ३१ ऑगस्टपर्यंत पदोन्नती प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

असे असेल पदोन्नती प्रक्रियेचे नवे वार्षिक वेळापत्रक

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये पदोन्नतीच्या प्रक्रियेत एकसूत्रता राहावी यासाठी शालेय शिक्षण विभागाने दरवर्षीचे एक निश्चित वेळापत्रक ठरवून दिले आहे
१ जानेवारीला तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली जाईल.३१ जानेवारीपर्यंत यादीवरील हरकती आणि आक्षेप नोंदवून अंतिम सेवाज्येष्ठता यादी जाहीर होईल.
१५ ते २२ फेब्रुवारी रोजी पदोन्नती समितीची बैठक पार पडेल. पुढील १ आठवड्यात पात्र उमेदवारांची शिफारस केली जाईल. ३१ मार्चपर्यंत पात्र शिक्षकांना पदोन्नतीचे अधिकृत आदेश दिले जातील.२ मे रोजी शिक्षकांना नवीन पदोन्नतीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी जुन्या शाळेतून कार्यमुक्त केले जाईल.

टीईटी उत्तीर्ण नसलेल्यांनाही दिलासा

सोलापूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन निर्णयामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, टीईटी उत्तीर्ण नसतानाही ज्या शिक्षकांना पदोन्नती मिळाली आहे किंवा मिळणार आहे, त्यांना टीईटी (TET) किंवा सीटीईटी (CTET) परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२८ पर्यंतची विशेष मुदत देण्यात आली आहे.

अंमलबजावणीची जबाबदारी अधिकाऱ्यांवर

या संपूर्ण वेळापत्रकाची काटेकोर आणि वेळेत अंमलबजावणी करण्याची मुख्य जबाबदारी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर (CEO) असणार आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायालयीन निर्णयाचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!