Latest Marathi News
Ganesh J GIF

१ ऑगस्टपासून खिसा खाली होणार की दिलासा मिळणार?; ‘हे’ ५ मोठे बदल प्रत्येक सर्वसामान्यासाठी महत्त्वाचे!

नव्या महिन्याची सुरुवात होताच सर्वसामान्यांच्या खिशाला थेट कात्री लागणार की दिलासा मिळणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. १ ऑगस्ट २०२६ पासून देशात अनेक मोठे आर्थिक आणि व्यावहारिक बदल लागू होण्याची शक्यता आहे. यामध्ये एलपीजी सिलिंडरच्या दरांपासून ते रेल्वे तिकीट, बँकिंग व्यवहार आणि दैनंदिन वस्तूंच्या किमतींचा समावेश आहे. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या घरच्या बजेटवर होणार असल्याने, महिना सुरू होण्यापूर्वीच हे ५ मोठे बदल जाणून घेणे तुमच्यासाठी आवश्यक आहे.

१. एलपीजी सिलिंडरच्या नव्या दरांची घोषणा
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल विपणन कंपन्या एलपीजी सिलिंडरचे नवे दर जाहीर करतात. त्यानुसार १ ऑगस्टला घरगुती (१४.२ किलो) आणि व्यावसायिक (१९ किलो) सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतला जाईल. गेल्या जुलै महिन्यात व्यावसायिक सिलिंडरचे दर कमी झाले होते, मात्र घरगुती सिलिंडरचे भाव स्थिर होते. त्यामुळे या महिन्यात गृहिणींना दिलासा मिळतो की महागाईचा फटका बसतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

२. रेल्वे तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये नवा नियम
भारतीय रेल्वेने प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. नव्या नियमांनुसार, रेल्वे स्थानकांवरील आरक्षण केंद्रांवर टोकन वाटप आणि तत्काळ तिकीट बुकिंगची प्रक्रिया एकाच वेळी सुरू केली जाणार आहे. या नव्या व्यवस्थेमुळे तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल आणि प्रवाशांचा वेळही वाचणार आहे.

३. टीव्ही, फ्रिजसह दैनंदिन वस्तू महागणार?
ऑगस्ट महिन्यापासून तुमच्या घरातील बजेट थोडे बिघडू शकते. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच अनेक FMCG (दैनंदिन वापराच्या) उत्पादनांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतींमध्ये ४ ते ६ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

४. विमान प्रवास महागणार की स्वस्त?
एलपीजी सिलिंडरप्रमाणेच तेल कंपन्या १ ऑगस्टला एअर टर्बाइन फ्युएल (ATF) म्हणजेच विमान इंधनाचे नवे दर जाहीर करतील. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींनुसार एटीएफच्या दरात बदल झाल्यास, विमान कंपन्या तिकिटांचे दर कमी-जास्त करू शकतात. त्यामुळे हवाई प्रवास करणाऱ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

५. बँकांच्या सेवा शुल्कात बदल 
१ ऑगस्ट २०२६ पासून बँकिंग नियमांमध्येही बदल पाहायला मिळतील. ‘उज्जीवन स्मॉल फायनान्स बँके’ने दिलेल्या माहितीनुसार, आता ग्राहकांसाठी एसएमएस अलर्ट शुल्कात बदल करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार, ठरावीक मासिक मर्यादेनंतर प्रति एसएमएस ३० पैसे शुल्क आकारले जाईल. याशिवाय इतरही काही बँका डेबिट कार्ड मेंटेनन्स आणि सेवा शुल्कात बदल करण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!