
पुणे पोलीस आणि महाराष्ट्र सायबर विभागाने मोठी कारवाई केली आहे. सायबर विभागाने सायबर फसवणुकीशी संबंधित बँक खात्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी मोठी मोहिम हाती घेतली आहे. ऑपरेशन म्यूल हंट अंतर्गत 152 संशयितांना अटक करण्यात आली आहे. 132 म्यूल खातेधारकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या करावाईमुळे सायबर गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. सायबर गुन्हेगार ऑनलाइन फसवणुकीतून मिळवलेले पैसे लपवण्यासाठी आणि हस्तांतरित करण्यासाठी दुसऱ्यांच्या बँक खात्यांचा वापर करतात. अशा खात्यांना ‘म्युल अकाउंट’ म्हटले जाते. या खात्यांचा वापर विविध ठिकाणी अवैध निधी हस्तांतरित करण्यासाठी आणि आपली खरी ओळख लपवण्यासाठी केला जातो. याच्या माध्यमातू सायबर ठग कोट्यावधी रुपयांची हेराफेरी करत आहेत.

विविध राज्यांकडून समन्वय पोर्टलद्वारे 1705 तक्रारी आल्या आहेत. यावर पुणे पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. पुणे पोलिसांनी इतर राज्यांमधील म्युल खातेधारकांनाही 2,099 नोटिसा पाठवल्या आहेत. तपासादरम्यान, पुणे, मुंबई, नवी मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या राज्यांमध्ये संशयितांना अटक करण्यात आली आहे. अनेक प्रकरणांमध्ये आरोपपत्रेही दाखल करण्यात आली आहेत.

बँकेचे व्यवहार, मोबाईल कॉल रेकॉर्ड, डिजिटल पेमेंटचा तपशील आणि इतर तांत्रिक पुराव्यांची कसून तपासणी करत आहेत, ज्यामुळे त्यांना संपूर्ण सायबर फसवणूक नेटवर्कचा पर्दाफाश करण्यास मदत होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. जे लोक पैसे किंवा इतर कोणत्याही फायद्याच्या बदल्यात सायबर गुन्हेगारांना आपले बँक खाते, एटीएम कार्ड, सिम कार्ड किंवा ओळखपत्रे देतील, त्यांनाही या प्रकरणात सहआरोपी बनवले जाईल आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. आपले बँक खाते, एटीएम कार्ड, चेकबुक, नेट बँकिंग माहिती, ओटीपी, सिम कार्ड, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, आधार किंवा पॅन माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नये. जर कोणी सायबर गुन्हेगारांना मदत करत असल्याचे तुमच्या लक्षात आले, तर तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर पोलिसांकडे याची तक्रार करा असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.


