
महाराष्ट्रात ११४ कट्टरतावादी साहित्यावर पूर्ण बंदी!; ‘ही’ पुस्तके, PDF फॉरवर्ड केल्यास होणार थेट कारवाई
महाराष्ट्र सरकारने हिंसक अतिरेकी विचारसरणी, कट्टरतावाद आणि जिहादाचे उदात्तीकरण करणाऱ्या साहित्याविरोधात कठोर पाऊल उचलले आहे. बंदी घातलेल्या विविध दहशतवादी संघटनांशी संबंधित ११४ प्रकारची पुस्तके, मासिके आणि डिजिटल प्रचारसाहित्यावर राज्य सरकारने पूर्णपणे बंदी घातली असून ते जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. गृह विभागाने ६ ऑगस्ट रोजी यासंदर्भातील अधिकृत राजपत्र जारी केले आहे.

बंदीचा नेमका अर्थ काय? ‘या’ गोष्टी केल्यास ठरेल गंभीर गुन्हा!

सरकारने स्पष्ट केले आहे की, या साहित्याचा प्रसार भारताचे सार्वभौमत्व, राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे आता खालील गोष्टी करणे हा गंभीर आणि दंडनीय गुन्हा मानला जाईल. या मासिकांचे किंवा पुस्तकांचे कोणत्याही प्रकारे प्रकाशन करणे, छापणे किंवा वाटप करणे. व्हॉट्सॲप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram) किंवा इतर कोणत्याही डिजिटल माध्यमातून या साहित्याच्या PDF फॉरवर्ड करणे अथवा शेअर करणे. हे साहित्य भौतिक पुस्तकांच्या रूपात किंवा डिजिटल स्वरूपात (मोबाईल, कॉम्प्युटर, हार्ड डिस्कमध्ये) स्वतःकडे बाळगणे अथवा सेव्ह करून ठेवणे.

तरुणांचे ‘ब्रेनवॉशिंग’ रोखण्यासाठी मोठा निर्णय
गुप्तचर यंत्रणा, सायबर सेल आणि राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या तपासातून एक धक्कादायक बाब समोर आली होती. दहशतवादी संघटनांशी संबंधित या साहित्याद्वारे हिंसक आणि अतिरेकी विचारसरणीचा प्रसार केला जात होता. तरुणांचे ‘ब्रेनवॉशिंग’ (Brainwashing) करून त्यांना दहशतवादी कारवायांकडे आकर्षित केले जात होते. देशाच्या अखंडतेविरोधात चिथावणी दिली जात होती. यावर आळा घालण्यासाठी सरकारने ही कठोर कारवाई केली आहे.
नेमक्या कोणत्या साहित्यावर आलीये बंदी?
राज्य सरकारने ज्या ११४ साहित्यांवर बंदी घातली आहे, त्यामध्ये प्रामुख्याने खालील प्रकाशनांचा समावेश आहे
‘व्हॉइस ऑफ खुरासान’ या मासिकाचे तब्बल ४४ अंक.
‘आर यू स्टिल सिटिंग’ आणि ‘व्हाय शुड यू जॉइन द इस्लामिक स्टेट’.
‘निदा-ए-खुरासान-१’ (उर्दू).
हिज्बुल मुजाहिदीनशी संबंधित ‘द रिव्होल्युशनरी रिसर्जन्स’.
अल-कायदाशी संबंधित ‘नवाई गजवा-ए-हिंद’, ‘स्कूल ऑफ युसूफ’ आणि ‘मॉडर्न वॉरफेअर’.
नागरिकांना आवाहन
अनजाने किंवा उत्सुकतेपोटी कोणत्याही संशयास्पद, कट्टरतावादी किंवा बंदी घातलेल्या साहित्याच्या PDF सोशल मीडियावर फॉरवर्ड करू नका. डिजिटल सुरक्षितता बाळगा आणि कायद्याचे पालन करा!

