
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील (NCP) अंतर्गत कलह आता उघड्यावर आला आहे. पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून वादाची ठिणगी पडली असून पक्षाच्या वरिष्ठ नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी थेट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याविरोधात एल्गार पुकारला आहे. “प्रदेशाध्यक्ष बदलणे हीच अजितदादांची इच्छा होती,” असा खळबळजनक दावा करत ठोंबरे यांनी तटकरेंच्या राजीनाम्याची थेट मागणी केली आहे.

“कार्यकाळ संपला, मग खुर्चीला कशाला चिकटून बसता?”

रुपाली पाटील ठोंबरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून आणि एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून आपली आक्रमक भूमिका मांडली. “कार्यकाळ पूर्ण झाला की सन्मानाने जागा रिकामी करणे हीच लोकशाहीची संस्कृती आहे. मग खुर्चीला एवढं चिकटून बसण्याचा हट्ट कशासाठी? दुसऱ्यांना हकालपट्टी करताना नियम आठवत होते, मग स्वतःवर तेच नियम लागू झाले की एवढी अस्वस्थता का?”

-रुपाली पाटील ठोंबरे (राष्ट्रवादी नेत्या)
‘जगदंबा मातेची शपथ घेऊन सांगते…’; रुपाली ठोंबरेंचा मोठा गौप्यस्फोट!
मुलाखतीदरम्यान १५ नोव्हेंबर रोजी घडलेल्या एका प्रकरणाची आठवण करून देत त्यांनी थेट जगदंबा मातेची शपथ घेऊन एक मोठा दावा केला. “१५ नोव्हेंबर रोजी आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा आमची अजितदादांशी भेट झाली, तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितले होते की मी प्रदेशाध्यक्ष बदलणार आहे. तुम्ही कामाला लागा.” वरिष्ठ मौन बाळगून आहेत: प्रदेशाध्यक्ष बदलणार हे पक्षातील सर्व वरिष्ठ आणि मंत्र्यांना माहिती आहे, पण ते कोणी बोलणार नाहीत. पक्ष संघटन मजबूत करायचे असेल तर बदल झालाच पाहिजे.
‘कार्यकर्त्यांना डावलले जायचे’; तटकरेंवर गंभीर आरोप
सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत रुपाली ठोंबरे म्हणाल्या. तटकरे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून कार्यकर्त्यांना नियुक्तीची पत्रे देताना दिरंगाई केली जायची. अजितदादांनी सांगूनसुद्धा कार्यकर्त्यांना डावलले जायचे, याची मी स्वतः साक्षीदार आहे. “तटकरे यांच्याशी आमचे वैयक्तिक भांडण नाही, परंतु पक्ष मजबुतीसाठी त्यांनी स्वतःहून प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा.”
प्रशांत किशोरांचा सल्ला अन् राष्ट्रवादीचे भवितव्य
काही दिवसांपूर्वीच राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन प्रदेशाध्यक्ष पदाबाबत महत्त्वाचा सल्ला दिल्याची चर्चा रंगली होती. त्यातच आता रुपाली पाटील ठोंबरे यांनी थेट तटकरेंविरोधात मोर्चा उघडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल होणार का? सुनेत्रा पवार काय निर्णय घेणार? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

