
पुणे जिल्ह्यातील बारामती शहरातून एक अत्यंत सुन्न करणारी आणि संशयास्पद घटना समोर आली आहे. टीसी कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी गेलेल्या एका २३ वर्षीय तरुणीचा अचानक प्रकृती बिघडून रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, या मृत्यूनंतर तरुणीच्या आईने पोलिसांत धाव घेत जो घटनाक्रम सांगितला, तो ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

नक्की काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी मृत तरुणी तिचा होणारा पती/प्रियकर अथर्व याच्यासोबत बारामतीतील टीसी कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी गेली होती. ॲडमिशनची प्रक्रिया सुरू असताना तरुणीने तिच्या आईला फोन करून सांगितले की, अथर्व तिला त्याच्या घरी घेऊन जात आहे. थोड्या वेळाने आईने जेव्हा तिला व्हिडिओ कॉल केला, तेव्हा ती अथर्वच्या कारमध्ये होती. त्यावेळी तिने आईला सांगितले की, ‘अथर्व मला एक गोळी देणार आहे आणि त्याला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत.’ हे ऐकताच आईने तिला स्पष्ट नकार दिला आणि तातडीने घरी परतण्यास सांगितले.

रात्री उशिरा मेसेज अन् थेट रुग्णालयातून फोन!
रात्री उशीर झाल्यानंतर आईने पुन्हा मेसेज केला असता, ‘आम्ही जेवत आहोत’ असा मेसेज तरुणीकडून आला. मात्र काही वेळातच थेट रुग्णालयातून फोन आला की तरुणीची प्रकृती चिंताजनक आहे. कुटुंबियांनी रुग्णालयात धाव घेतली, मात्र डॉक्टरांनी तरुणीला मृत घोषित केले.
मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा; अथर्व रोज देत होता गोळ्या?
तरुणीच्या मृत्यूनंतर तिच्या मैत्रिणीने आईला एक अत्यंत महत्त्वाचा खुलासा केला. अथर्व गेल्या काही दिवसांपासून तरुणीला कोणत्यातरी गोळ्या/औषध देत होता, अशी माहिती मैत्रिणीने दिली. विशेष म्हणजे, अथर्व आणि मृत तरुणी या दोघांचे लग्न ठरले होते. लग्न ठरलेले असतानाच होणाऱ्या पतीकडूनच अशा प्रकारे गोळ्या दिल्या जात असल्याची माहिती समोर आल्याने बारामतीत प्रचंड खळबळ उडाली आहे.
पोलीस तपास सुरू
या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीला नेमकी कोणती गोळी किंवा औषध देण्यात आले होते? त्याचा तिच्या शरीरावर काय परिणाम झाला आणि या औषधामुळेच तिचा मृत्यू झाला का? या सर्व दिशांनी पोलीस कसून तपास करत आहेत.

