
नरेंद्र पाटलांचा थेट इशारा अन् मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई!; ‘त्या’ वादग्रस्त अधिकाऱ्याची अखेर हाकलपट्टी!
गेल्या काही महिन्यांपासून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळात सुरू असलेला हायव्होल्टेज ड्रामा अखेर संपुष्टात आला आहे. महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) विजयसिंह देशमुख यांच्यातील वाद शिगेला पोहोचल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात थेट हस्तक्षेप करत एमडी विजयसिंह देशमुख यांची अखेर बदली केली आहे.

नक्की काय होता वाद?

अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी एमडी विजयसिंह देशमुख यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. देशमुखांमुळे महामंडळाचा कारभार ठप्प पडल्याचा दावा पाटील यांनी केला होता.नरेंद्र पाटील यांनी देशमुखांवर ‘मराठाद्वेषी अधिकारी’ अशी तीव्र टीका केली होती. मराठा समाजातील तरुण उद्योजकांचे मंजूर झालेले ‘Letter of Intent’ (LY) अचानक रद्द केल्याने तरुणांमध्ये देशमुखांविरोधात तीव्र असंतोष होता.

विखे पाटलांची भेट आणि मुख्यमंत्र्यांना अहवाल
नरेंद्र पाटील यांनी मराठा समाजातील तरुण उद्योजकांच्या तक्रारींनंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला होता. यानंतर त्यांनी पाच जिल्ह्यांचा दौरा करून एक विशेष अहवाल तयार केला आणि तो थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला.
मुख्यमंत्र्यांची धडक कारवाई; ‘हे’ असणार नवे MD!
अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची तक्रार आणि मराठा समाजातील तरुणांमधील असंतोष यांची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी एमडी विजयसिंह देशमुख यांची बदली करण्याचे आदेश दिले.
नवे व्यवस्थापकीय संचालक (MD)
विजयसिंह देशमुख यांच्या जागी आता अविनाश रणखांब यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे नवे एमडी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे मराठा समाजातील नवउद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

