
मुंबईच्या राजकारणातून एक अत्यंत महत्त्वाची आणि राजकीय घडामोड समोर येत आहे. आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात महत्त्वाची भूमिका बजावणारे ठाकरे कुटुंबीयांचे विश्वासू सचिन अहिर यांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. या धक्क्यातून ठाकरे गट सावरत नाही तोच, आता सचिन अहिर यांचे बंधू सुनील अहिर हेदेखील शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

शिंदे गटाच्या बैठकीला हजेरी; चर्चांना उधाण!

ठाकरे गटाकडून ‘बेस्ट’ (BEST) समितीचे स्वीकृत सदस्यपद मिळालेले सुनील अहिर अलीकडच्या काळात शिंदे गटाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सातत्याने उघडपणे सहभागी होत आहेत. नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या शिंदे गटाच्या महत्त्वपूर्ण बैठकीला त्यांनी हजेरी लावल्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय निर्णयाबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर सुनील अहिर बेस्ट समितीचा राजीनामा देतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, तांत्रिकदृष्ट्या ते अद्याप ठाकरे गटाचे सदस्य असले, तरी शिंदे गटातील वाढत्या सहभागामुळे ते लवकरच अधिकृत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

सचिन अहिर यांच्यावर मुंबईची मोठी जबाबदारी!
एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर यांना आपल्या गटात खेचत विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाने आपला बालेकिल्ला राखला होता, तर शिंदे गटाला अपेक्षित यश मिळाले नव्हते. त्यामुळे मुंबईच्या राजकारणाची खडान् खडा माहिती असलेल्या सचिन अहिर यांच्यावर आता एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील पक्षसंघटन मजबूत करण्याची आणि पक्षबांधणीची मुख्य सूत्रे सोपवली आहेत.अहिर बंधूंच्या या राजकीय भूमिकेमुळे वरळीसह संपूर्ण मुंबईत ठाकरे गटाला मोठे आव्हान निर्माण झाले असून, आगामी काळात मुंबईच्या राजकारणात काय मोठे फेरबदल होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

