
विद्यार्थ्यांच्या जीवाशी होणार खेळ सीसीटीव्हीत कैद
विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात, विद्यार्थी सुखरुप
अंबरनाथ दि २६(प्रतिनिधी)-अंबरनाथ पूर्वेतील ग्रीन सिटी संकुल परिसरात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका छोट्या बसला सोमवारी सकाळच्या सुमारास अपघात झाला. बस मागे घेताना अचानक बस उलटली. यावेळी बसमध्ये १७ ते १८ विद्यार्थी होते अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

अंबरनाथच्या ग्रीन सिटी परिसरात नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत सोडण्यासाठी स्कूल बस निघाली होती. या सर्व विद्यार्थ्यांना घेऊन ही बस अंबरनाथच्या इनरव्हील निघणार होती. यावेळी ही बस ग्रीन सिटी संकुलात एका चढणीवर उभी असताना अचानक चालकाचा ताबा गाडीवरून सुटल्याने ही बस थेट रिव्हार्स्मध्ये खाली उतरली आणि एका डिव्हायडरला आदळून ती बस उलटली. हा सर्व प्रकार सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये देखील कैद झाला आहे. ही बस उटल्यानंतर लागलीच परिसरात इतर शाळेचे जे विद्यार्थी उभे होते ते देखील अपघातग्रस्त बस मधील विध्यार्थ्यांना वाचण्यासाठी पुढे सरसावले तसेच सोसायटीतील इतर नागरिकांनी या सर्व विध्यार्थ्यांना बसमधून सुखरूप बाहेर काढले.

अपघातानंतर स्थानिक रहिवाशांनी बस मालकाविरोधात संताप व्यक्त केलाय. या बसचा इन्शुरन्सही काढला नव्हता. तसंच, बस अत्यंत मोडकळीस आली होती. ही बस शाळेची नसल्याचं रोटरी शाळेच्या व्यवस्थापकांनी स्पष्ट केलं आहे. या घटनेनंतर पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलं आहे.



 
						 
			