
गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष एनडीएमध्ये (NDA) सहभागी होणार असल्याच्या राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता या सर्व चर्चांवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षांतर्गत बैठकीत स्पष्ट भूमिका मांडत पूर्णविराम दिला आहे. “आपण विरोधातच आहोत, कोणीही संभ्रमात राहू नये. सर्वांनी जोमाने कामाला लागा,” असा थेट आणि स्पष्ट संदेश शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला असल्याचे सूत्रांकडून समजते. शरद पवार यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीमधील (MVA) कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा संभ्रम दूर होण्यास मदत होणार आहे.

दिल्लीतील भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण

काही दिवसांपूर्वीच शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या सर्व आठ खासदारांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. तसेच सुप्रिया सुळे व खासदार बजरंग सोनवणे यांनी गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली होती.
या दिल्लीतील भेटीगाठींनंतर सर्व खासदारांची शरद पवारांसोबत मुंबईत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या घडामोडींमुळे शरद पवार गट सत्ताधारी एनडीएसोबत जाणार का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या.

सुप्रिया सुळे यांचे जिल्हाध्यक्षांना निर्देश
शनिवार आणि रविवारी पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या दोन दिवसीय आढावा बैठकीत विविध जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांनी “पक्ष एनडीएमध्ये जाणार आहे का?” असा सवाल उपस्थित केला. यावर उत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकत्याच पार पडलेल्या संसदीय अधिवेशनातील आपल्या सरकारविरोधी भाषणांचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर ज्याप्रमाणे आपण सभागृहात लढत आहोत, त्याच ताकदीने आपल्याला रस्त्यावर उतरूनही लढायचे आहे. जिल्ह्यातील सर्व रिक्त पदे तातडीने भरून कामाला लागा. लवकरच संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार असून जनतेच्या प्रश्नांवर आक्रमकपणे लढा.
प्रादेशिक आढावा अंतिम टप्प्यात
या दोन दिवसीय बैठकीत खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांचा सविस्तर आढावा घेतला आहे. आता केवळ कोकण विभागातील जिल्ह्यांचा आढावा बाकी असून लवकरच पक्षाची पुढील रणनीती अधिक तीव्र केली जाणार आहे.

