
८ वर्षांच्या मुलीने बरमुडा घातल्याने सिंहगडावर राडा!; पर्यटकांना मारहाण करणाऱ्या ‘समस्त हिंदू बांधव आर्मी’च्या ८ जणांवर गुन्हा दाखल
ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर फिरायला आलेल्या एका कुटुंबातील अवघ्या ८ वर्षांच्या चिमुकल्या मुलीने बरमुडा घातला असल्याच्या कारणावरून तिच्या वडिलांना आणि इतर पर्यटकांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पर्यटकांना धक्काबुक्की व मारहाण करणाऱ्या ‘समस्त हिंदू बांधव आर्मी’ (SHB Army) च्या तरुण-तरुणींसह आठ जणांवर हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकेत संजय पाटील,आशिष दिलीप अपार,रेवण नारायण कोकाटे,सायली सुजीत चव्हाण,केतकी सुरज जाधव,अमर रामचंद्र शिर्के,कुणाल किसन नलावडे
आर्या प्रवीण कवडे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत

नेमका काय घडला प्रकार?

याबाबत अवधूत पांडुरंग पाटील (वय ३९, रा. धायरी, पुणे) यांनी हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविवारी (दि. १५) दुपारी फिर्यादी हे आपली पत्नी, मुलगा, पुतण्या आणि मित्र जोसेफ डिसोझा यांच्यासोबत सिंहगडावर गेले होते. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन फोटो काढल्यानंतर ते पुढे जात असताना ‘समस्त हिंदू बांधव आर्मी’च्या ७ ते ८ कार्यकर्त्यांनी त्यांना अडवले.

“बरमुडा घालून का आलात? येथे फोटो का काढता, खाली जा,” असे म्हणत त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. फिर्यादींनी “आम्ही जात आहोत, आता मारणार आहात का?” असे विचारताच आरोपींनी फिर्यादीच्या गालावर चापती मारल्या. तसेच एका तरुणीने फिर्यादीच्या पत्नीचा हात पकडून गर्दीत ओढत “तुम्हाला हिंदू संस्कृती समजत नाही का?” असे म्हणून दमदाटी केली.
इतर पर्यटकांनाही केली मारहाण
घाबरलेले कुटुंब गडावरून खाली उतरत असताना पोलिसांची गाडी आल्याने त्यांनी घडलेला प्रकार सहाय्यक पोलीस निरीक्षक चवरे यांना सांगितला. त्यानंतर हवेली पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर तेथे उपस्थित असलेले इतर पर्यटक खुशबू बदावणे, करिश्मा बदावणे, विशाल खंडागळे आणि आदर्श ढेकाळे यांनीही या टोळक्याने आपल्याला मारहाण केल्याचे पोलिसांना सांगितले.
हवेली पोलिसांकडून गुन्हा दाखल
हवेली पोलिसांनी तत्परता दाखवत सर्व ८ संशयित तरुण-तरुणींना ताब्यात घेतले. सर्व पीडित पर्यटकांनी मारहाण करणाऱ्यांना ओळखल्यानंतर पोलिसांनी आठही आरोपींवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. ऐतिहासिक वास्तुंवर पर्यटकांशी अशा प्रकारे दादागिरी आणि नैतिक पोलीसगिरी (Moral Policing) करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांमधून केली जात आहे.

