
नात्यातील एका महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवल्याच्या वादातून एका ५९ वर्षीय व्यक्तीचे पुण्यातून मध्यरात्री अपहरण करून सांगलीत नेऊन त्यांचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी एका महिलेसह तीन तरुणांना अटक केली आहे.

गोविंदा उपासे असे मृत व्यक्तीचे नाव

गोविंद उपासे (वय ५९, रा. गोकुळनगर, वारजे माळवाडी, पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी रोहित गोविंद उपासे (वय ३५, रा. तपोधाम, वारजे माळवाडी) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तातोबा उर्फ वैभव अर्जुन केंगार (वय २८, सध्या रा. आंबेगाव बुद्रुक, मूळ रा. बेळंकी, ता. जत, जि. सांगली),राहुल राजेंद्र बाबर (वय २५, रा. बेळंकी, ता. जत, जि. सांगली). रोहन जयसिंग सावंत (वय २३, रा. येतगाव, ता. कडेगाव, जि. सांगली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत

नेमकी घटना काय घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास गोविंद उपासे हे धायरी येथे मित्रांसोबत जेवायला गेले होते. जेवण करून ते घरी परतल्यानंतर मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास आरोपींनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. “मित्रांना भेटून येतो” असे घरात सांगून उपासे दुचाकीवरून बाहेर पडले, मात्र ते पुन्हा घरी परतलेच नाहीत. मुलगा जयवंत याने ११ ऑगस्ट रोजी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात वडील बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.
सांगलीत भांडण अन् अपहाराचा खुलासा
१२ ऑगस्ट रोजी सांगली शहरातील शामरावनगर येथील घोड्याच्या तबेल्याजवळ काही जणांचे भांडण सुरू असल्याची माहिती सांगली पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत केंगार, बाबर आणि सावंत या तिघांना ताब्यात घेतले. पोलीस तपासात या तिघांनी पुण्यातून गोविंद उपासे यांचे अपहरण केल्याची अन् त्यांना जबर मारहाण करून मृतदेह कडेगाव येथील कालव्यात फेकून दिल्याची कबुली दिली.
सीसीटीव्ही फुटेजमुळे भांडाफोड
सांगली पोलिसांनी तात्काळ या घटनेची माहिती पुण्यातील नांदेड सिटी पोलिसांना दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले असता, आरोपी उपासे यांना मारहाण करून कारमधून पसार होत असल्याचे स्पष्ट दिसले. नात्यातील महिलेला मेसेज पाठवल्याच्या रागातूनच पूर्वग्रहदूषित कटातून हे हत्याकांड घडल्याचे उघड झाले असून, आंबेगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

