Latest Marathi News
Ganesh J GIF

मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय!; शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून परीक्षा कक्षात ‘इतक्या’ मिनिटे आधी उपस्थित राहणे अनिवार्य

मुंबई विद्यापीठाने परीक्षा पद्धतीत अधिक शिस्त आणण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून मुंबई विद्यापीठ आणि त्याशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेच्या तब्बल ३० मिनिटे आधी परीक्षा कक्षात (Exam Hall) उपस्थित राहावे लागणार आहे. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळ, व्यवस्थापन परिषद आणि विद्वत परिषदेच्या बैठकीत या नव्या नियमावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आगामी सर्व शैक्षणिक सत्र आणि परीक्षांसाठी हा नियम काटेकोरपणे लागू केला जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

नियम लागू करण्याचे मुख्य कारण काय?

विद्यापीठ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या कडक नियमावलीमागे मुख्यत्वे पुढील कारणे आहेत:

पडताळणी प्रक्रियेसाठी वेळ: परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट (Hall Ticket), ओळखपत्र (ID Card) तपासणे, आसनव्यवस्था शोधणे आणि बायोमेट्रिक पडताळणी प्रक्रियांसाठी पुरेसा वेळ मिळणे आवश्यक असते.

धावपळ व गैरसोय टळणार: अगदी शेवटच्या मिनिटाला परीक्षा केंद्रावर पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांची होणारी धावपळ आणि मानसिक ताण टाळण्यास मदत होईल.

काप्या व पेपरफुटीला आळा: परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता राहावी, अलीकडच्या काळात होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसावा आणि खबरदारीचा उपाय म्हणून ही कडक नियमावली तयार करण्यात आली आहे.

परीक्षेचे ‘वेळेचे गणित’ कसे असेल?

विद्यापीठाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार जर परीक्षेची वेळ सकाळी १०:३० वाजता असेल, तर सर्व विद्यार्थ्यांना सकाळी १०:०० वाजेपर्यंत परीक्षा कक्षात आपापल्या जागेवर उपस्थित राहावेच लागेल. निर्धारित वेळेपेक्षा उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणे कठीण होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शेवटच्या क्षणी येणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्राचार्य आणि महाविद्यालयांना स्पष्ट निर्देश

परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी यासंदर्भात अधिकृत पत्रक जारी केले आहे.विद्यापीठाचे सर्व शैक्षणिक विभाग, संलग्न व स्वायत्त महाविद्यालयांचे प्राचार्य, उपपरिसरांचे समन्वयक आणि संस्थाचालकांनी हा नवा नियम सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच परीक्षा कर्मचाऱ्यांच्या तात्काळ निदर्शनास आणून द्यावा, असे कडक निर्देश त्यांनी दिले आहेत.परीक्षा अत्यंत सुरळीत, शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्व नियमांचे पालन करून परीक्षा कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!