Latest Marathi News
Ganesh J GIF

आमदार संग्राम जगतापांसह १९ जणांवर मिरजगाव पोलिसांत गुन्हा दाखल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या विटंबनेच्या निषेधार्थ कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात फाटा येथे करण्यात आलेल्या रस्ता रोको आंदोलनाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय १०० ते १५० अनोळखी आंदोलनकर्त्यांवरही मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात फाटा परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याची घटना घडली होती. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून, दोषींवर तातडीने व कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेदरम्यान चिंचोली काळदात फाटा परिसरात तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये आमदार संग्राम जगताप यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रवाशांची अडवणूक आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन

पोलीस शिपाई बळीराम गोपीनाथ काकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मिरजगाव पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस फिर्यादीतील प्रमुख आरोप

जमावबंदीचे उल्लंघन: परिसरात जिल्हाधिकाऱ्यांचे जमावबंदीचे आदेश लागू असतानाही बेकायदेशीर जमाव जमवण्यात आला.

वाहतुकीस अडथळा: श्रीगोंदा-जामखेड व कर्जत-मिरजगाव या राज्यमार्गावरील प्रवाशांची अडवणूक करून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण केला गेला.

जीव धोक्यात घालणे: मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना मज्जाव करत त्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने आंदोलन चालवले गेले.

‘या’ १९ जणांवर गुन्ह्याची नोंद

मिरजगाव पोलिसांनी या प्रकरणात खालील प्रमुख नेत्यांवर व कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदवले आहेत. आमदार संग्राम जगताप,धवलसिंह मोहिते,ॲड. आकाश सर्जेराव हाळनवर,शुभम माने,चंदनसिंग परदेशी,नितीन तोरडमल (शिवसेना तालुकाध्यक्ष),वैभव काळदाते,सावन शेटे,उदयसिंग परदेशी,दीपक गांगर्डे,विठ्ठलसिंग शेडगे,रघुआबा काळदाते,धनंजय बांदल,बाळासाहेब निंबोरे,राहुल मते,प्रसाद कानगुडे,बालाजी लाळगे,सुनील यादव,ऋषिकेश काळदाते
तसेच १०० ते १५० इतर अनोळखी व्यक्ती यांच्यावर गुन्हे नोंदवले आहेत.

“आवाज उठवणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनाच टार्गेट केलं जातंय” – आमदार संग्राम जगताप

गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. प्रतिक्रिया देताना जगताप म्हणाले “मला किंवा कार्यकर्त्यांना टार्गेट केल्याने हा प्रश्न सुटणार नाही. मी नसलो तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी हे काम पुढे सुरूच राहील. शिवरायांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्या मुख्य आरोपींवर कठोर कारवाई करण्याऐवजी, त्या अन्यायकारक घटनेविरोधात आवाज उठवणाऱ्या हिंदू कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल केले जात आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे.”या कारवाईमुळे या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले असून, आगामी काळात पोलीस आणि लोकप्रतिनिधींमधील हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!