Latest Marathi News
Ganesh J GIF

कल्याणीनगरमधील हायप्रोफाईल दुकानातून २० हजारांची विदेशी दारू चोरी; येरवडा पोलिसांकडून दोन अट्टल चोरांना ठोकल्या बेड्या!

पुण्यातील कल्याणीनगरसारख्या हायप्रोफाईल परिसरातून एका नामांकित दुकानातून महागड्या विदेशी दारूच्या बाटल्या चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात येरवडा पोलीस ठाण्याच्या गस्तीवर असलेल्या पथकाने अत्यंत तत्परतेने कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सुमारे २०,३०० रुपये किमतीच्या ६ विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

जीएसटी (GST) कार्यालयाजवळ पोलिसांची ‘सुपर फास्ट’ कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, येरवडा पोलिसांचे पथक परिसरात नियमित गस्त घालत होते. गस्तीदरम्यान पोलीस अंमलदार संदीप जाधव यांना गुप्त माहिती मिळाली की, जीएसटी (GST) कार्यालयाजवळ दोन तरुण अत्यंत संशयास्पद स्थितीत थांबले आहेत.माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोन्ही तरुणांना घेराव घालून ताब्यात घेतले.

पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न निष्फळ!

ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला दोघांकडे चौकशी केली. मात्र, दोन्ही आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांनी दोघांची झाडाझडती घेतली. या झाडाझडतीत त्यांच्याकडे तब्बल २०,३०० रुपये किमतीच्या ६ महागड्या विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसी हिसका दाखवताच आरोपींनी कल्याणीनगर येथील एका दुकानातून या बाटल्या चोरल्याची कबुली दिली.

‘या’ दोन आरोपींना केली अटक

येरवडा पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे रोहन राम कांबळे (वय २८, रा. प्रिस्टीन सिटी, वाकड), अमित महादेव शितापूरे (वय २९, रा. सिद्धार्थनगर, येरवडा) आहेत.

पोलीस पथकाची धडक कारवाई

ही धडक कारवाई पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड यांच्यासह पोलीस अंमलदार बालाजी सोने, संदीप जाधव, गणेश पावले, साईनाथ म्हस्के, अनिल मनाळकर, शैलेश वाबळे, नटराज सुतार आणि सोमनाथ गायकवाड यांच्या पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. येरवडा पोलीस या चोरीच्या गुन्ह्याचा पुढील कसून तपास करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!