
घाटकोपर परिसरात ३५ वर्षीय सपना गंजी या महिलेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता अत्यंत धक्कादायक वळण मिळाले आहे. सुरुवातीला बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने अपघात झाल्याचा दावा सासरच्या मंडळींकडून करण्यात आला होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा अपघात नसून सुनेची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी सासूसह पाच जणांना अटक केली आहे.

काय आहे संपूर्ण घटना?

सपना गंजी या आपल्या मुलासोबत काही काळ दुबईत वास्तव्यास होत्या आणि महिन्याभरापूर्वीच मुंबईत परतल्या होत्या. १६ ऑगस्ट रोजी घरात असताना त्यांचा मृत्यू झाला. सासरच्या लोकांनी त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सपना यांना दारूचे व्यसन आणि विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप सासू धनलक्ष्मी यांनी केला होता.

पोलिसांना कसा आला संशय?
मृतदेहाची पाहणी करताना सपना यांच्या गळ्याभोवती काळे-निळे व्रण तसेच डोक्याला दुखापत आणि रक्तस्राव झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर आणि संशयास्पद खुणांमुळे पंतनगर पोलिसांनी हत्येच्या दृष्टीने तपास सुरू केला.तपासात समोर आले की, २०२४ मध्ये सपना यांनी सासरच्यांविरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. याच जुन्या वादाचा राग मनात धरून सासू धनलक्ष्मी गंजी (६०) हिने सुनेच्या हत्येचा कट रचला.
३ लाखांची सुपारी देऊन हत्या
सासू धनलक्ष्मीने आपल्या माजी मोलकरणीला मंगलाबाई जाधव (४५) हिला ३ लाख रुपयांचे आमिष दाखवून हत्येची सुपारी दिली. सपना घरात एकट्या असताना आरोपींनी घरात प्रवेश करून त्यांच्यावर हल्ला केला आणि गळा आवळून हत्या केली. त्यानंतर हा केवळ एक अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला.
५ आरोपी पोलिसांच्या ताब्यात
सपना यांच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुख्य आरोपी सासू धनलक्ष्मी गंजी, माजी मोलकरीण मंगलाबाई जाधव, शिवानी जाधव (२१), सुरेश जाधव (४६) आणि साजन जाधव (१९) या ५ जणांना अटक केली आहे. या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

