
नाशिकचे अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच लातूर जिल्ह्यातून भोंदूगिरीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १५ ते २० कोटी रुपयांच्या पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीच्या माध्यमातून अघोरी लक्ष्मीपूजा करण्याचा प्रयत्न उदगीर ग्रामीण पोलिसांनी यशस्वीपणे उधळून लावला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मुख्य तांत्रिकाला तेलंगणातून बेड्या ठोकल्या आहेत. बालाजी मंगल बलराज (वय ३८, रा. चिनार कोडमंगल, जि. कामारेड्डी, तेलंगणा) असे अटक केलेल्या मुख्य आरोपीचे नाव असून तो व्यवसायाने नाभिक आहे.

काय आहे संपूर्ण घटना?

उदगीर तालुक्यातील करडखेल पाटीजवळ १६ ऑगस्ट रोजी हा प्रकार उघडकीस आला होता. पैशाचा पाऊस पाडण्याच्या कथित अघोरी विधीसाठी आंध्र प्रदेशातील एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा वापर केला जाणार होता. या गुप्त माहितीच्या आधारे उदगीर पोलिसांनी ऐनवेळी धाड टाकून मोठा अनर्थ टाळला.

पोक्सो (POCSO) आणि जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा
या प्रकरणी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि पुणे परिसरातील एकूण १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी १३ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आता या अघोरी पूजेची मुख्य जबाबदारी असलेल्या बालाजी बलराज याला तेलंगणातून अटक करण्यात आली आहे. आरोपींवर ‘महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा’ तसेच ‘पोक्सो कायद्यातील’ (POCSO) गंभीर कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस तपासाबाबत काय म्हणाले अधिकारी?
“अटक केलेल्या तांत्रिकाने या सर्व लोकांशी कसा संपर्क साधला? त्याच्या संपर्कात सर्वप्रथम कोण आले होते? आणि या विधीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे, या सर्व बाबींचा कसून तपास सुरू आहे,” अशी माहिती उदगीरचे पोलीस उपाधीक्षक गजानन भातलवंडे यांनी दिली आहे. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

