
पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथे चौथीत शिकणाऱ्या नऊ आणि साडेनऊ वर्षांच्या एका चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ओळखीच्याच एका तरुणाने हे गैरकृत्य केल्याने संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

आजारपणाचा घेतला गैरफायदा

चौथीत शिकणाऱ्या या चिमुकलीचे आई-वडील शेतमजुरीसाठी बाहेर जात असत. मुलगी नेहमी शाळेत जात असल्याने ती कधी घरी एकटी नसायची. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ती आजारी असल्याने घरीच होती. आरोपी हा तिच्या घरासमोरच राहत असल्याने तो ओळखीचा होता. मुलगी घरी एकटी असल्याचे हेरून त्याने तिच्यावर अत्याचार केला आणि तिची हत्या केली. “ती शाळेत गेली असती, तर कदाचित तिचा जीव वाचला असता,” अशी हळहळ ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

शोधाशोध आणि पोलिसांचा तपास
१८ ऑगस्टच्या रात्री मुलगी बेपत्ता झाल्याचे समजताच ग्रामस्थ तिच्या शोधासाठी बाहेर पडले. विशेष म्हणजे, आरोपी तरुणही गावकऱ्यांसोबत मुलीचा शोध घेण्याचे नाटक करत होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेची पथके दाखल झाली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एका दृश्यात सायकलवरून जाणारा एक तरुण दिसला. विचारणा केली असता त्या तरुणाने ‘हा तर मीच आहे’ असे सहज सांगितले. मात्र, त्याच्या हालचालींवर पोलिसांचा संशय बळावला. दरम्यान, शोधमोहिमेदरम्यान रात्री ओढ्याच्या परिसरातील झाडाजवळ चिमुकलीचा मृतदेह आढळून आला.
कसून चौकशीत गुन्ह्याची कबुली
पोलिसांनी संशयित तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्या जबाबात अनेक विसंगती दिसून आल्या. अधिक कसून चौकशी केली असता त्याने या भयानक गुन्ह्याची कबुली दिली. या दुर्दैवी घटनेमुळे पिंपळवंडीसह जुन्नर तालुक्यात शोकाकुल वातावरण पसरले असून ओळखीच्याच व्यक्तीने विश्वासाघात केल्याने नागरिकांमधून कडक कारवाईची मागणी केली जात आहे.

