Latest Marathi News
Ganesh J GIF

पवईत तृतीयपंथीयाचा वेश परिधान करून एअर होस्टेसवर अत्याचार; पोलिसांनी ४ तासांत आरोपीला आवळल्या बेड्या

मुंबईतील उच्चभ्रू भाग असलेल्या पवई परिसरातून एक अतिशय धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका नराधमाने तृतीयपंथीयाचा वेश परिधान करून एका एअर होस्टेसच्या घरात घुसखोरी केली आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पवई पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या चार तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

‘नजर काढण्याच्या’ बहाण्याने घरात प्रवेश

मिळालेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्ट रोजी दुपारी २५ वर्षीय पीडित महिला घरी एकटी असल्याचा फायदा आरोपीने घेतला. अनिल शिंदे असे या आरोपीचे नाव असून त्याने साडी परिधान करून स्वतःला तृतीयपंथी भासवले होते. ‘दुष्ट नजर दूर करणे’, ‘नजर काढणे’ आणि ‘मूल होण्यासाठी आशीर्वाद देणे’ या बहाण्याने त्याने घरात प्रवेश मिळवला. घरात शिरल्यानंतर पूजाविधीचा आव आणून त्याने पीडितेला बेडवर झोपण्यास सांगून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर ‘लवकरच मूल होईल’ असे सांगून तिच्याकडून २ हजार रुपये उकळले आणि तिथून पळ काढला.

सीसीटीव्ही आणि ऑटो रिक्षाच्या नंबरने उघड झाला बनाव

पीडित एअर होस्टेसने तात्काळ पवई पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची वेगाने तपासणी केली. फुटेजमध्ये आरोपी साडी परिधान करून एका ऑटो रिक्षात बसून जाताना दिसून आला. पोलिसांनी तातडीने रिक्षाच्या नंबरवरून माग काढत ठाण्यातील कळवा-खारेगाव परिसरातून अनिल शिंदेला ताब्यात घेतले.

पोलीस कोठडीत रवानगी; इतर गुन्ह्यांचा शोध सुरू

पोलीस चौकशीत तो मूळचा पुरुष असून फसवणूक आणि गुन्हे करण्याच्या उद्देशानेच तृतीयपंथीयाचा वेश धारण करत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कारासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने अशाच प्रकारे इतर ठिकाणीही महिलांना जाळ्यात ओढले आहे का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे घरात एकट्या असलेल्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!