Latest Marathi News
Ganesh J GIF

कुंभमेळ्यासाठी रुग्णालय पाडण्याचा घाट!; त्र्यंबकेश्वरमध्ये आदिवासी नागरिक आक्रमक

२०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीवरून त्र्यंबकेश्वरमध्ये मोठा वाद पेटला आहे. प्रस्तावित ‘दर्शन मार्ग’ विकसित करण्यासाठी प्रशासनाने येथील ५० बेडचे उपजिल्हा रुग्णालय पाडण्याचा निर्णय घेतला असून, रुग्णालय दुसऱ्या ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे. १५ ऑगस्टपासून हे रुग्णालय बंद करण्यात आल्याने स्थानिक आदिवासी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

“आमचा दवाखाना इथेच हवा!” – महिलांचा आक्रोश

रुग्णालयातील वैद्यकीय साहित्य नवीन इमारतीत हलवले जात असताना स्थानिक नागरिक आणि महिलांनी प्रशासनाला जोरदार विरोध केला. “दर्शन महत्त्वाचे नाही, तर आमचा पेशंट महत्त्वाचा आहे,” असा थेट सवाल संतप्त महिलांनी केला आहे. ८० वर्षीय लक्ष्मीबाई यांनी “दवाखाना कुठेही नेऊ नका, आम्हाला दूर जाणे शक्य नाही” असा उद्विग्न आक्रोश व्यक्त केला. स्थानिकांच्या मते, आतापर्यंत ४-५ कुंभमेळे झाले तरी दवाखाना कधीही हलवण्यात आला नव्हता, मग आताच ही वेळ का आली?

४ किलोमीटर दूर जाण्याची पाळी; नागरिक हैराण

हे रुग्णालय पूर्वी बसस्टँडपासून अवघ्या २ मिनिटांच्या अंतरावर होते. त्यामुळे आजूबाजूच्या आदिवासी भागातील रुग्णांना येथे पोहोचणे अत्यंत सोयीचे ठरत होते. मात्र, आता रुग्णालय तुपादेवी फाट्यावरील ‘विवेकानंद हॉस्पिटल’च्या इमारतीत हलवण्यात आल्याने रुग्णांना तब्बल ४ किलोमीटर दूर जावे लागणार आहे. १५ ऑगस्टला अचानक बोर्ड लावून रुग्णालय स्थलांतरित केल्याचे समजल्याने स्थानिकांनी प्रशासकीय कारभारावर जोरदार ताशेरे ओढले आहेत.

प्रशासनाची कबुली; सर्व सुविधा देण्याचा दावा

स्थानिकांच्या त्रासाबाबत बोलताना त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक रमेश पवार यांनी सांगितले की, “पुढील ३ वर्षांसाठी हे रुग्णालय तुपादेवी फाट्यावरील इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे. नवीन ठिकाण जुन्या इमारतीपासून ४ किमी अंतरावर असून रुग्णांना तिथे पोहोचण्यासाठी थोडी अडचण येत आहे हे खरे आहे. मात्र, नवीन ठिकाणी रुग्णांना सर्व वैद्यकीय सुविधा पुरवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे”. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे स्थानिक नागरिक आणि आदिवासी बांधव मात्र अधिकच आक्रमक झाले असून, रुग्णालय जुन्याच जागी पूर्ववत सुरू ठेवण्याची मागणी जोर धरत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!