
“मुलगाच जन्माला घालता येत नाही” म्हणून पुण्यातील PSI कडून पत्नीचा गळा आवळून हत्येचा प्रयत्न; जबरदस्तीने बेकायदेशीर गर्भपात
खाकी वर्दीचा धाक गुन्हेगारांवर असावा लागतो, मात्र पुण्यात खुद्द कायद्याचा रक्षकच पत्नीसाठी यमदूत बनल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. “तुला मुलगाच जन्माला घालता येत नाही,” असा विकृत संताप व्यक्त करत पुण्यातील मांजरी परिसरातील एका पोलीस उपनिरीक्षकाने (PSI) स्वतःच्या गरोदर पत्नीचा गळा आवळून तिला संपवण्याचा प्रयत्न केला. तसेच पोटातील बाळ मुलगी असल्याचे कळताच बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करून जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

माय-लेकावर हत्येचा प्रयत्न आणि बेकायदेशीर गर्भपाताचा गुन्हा

हडपसरमधील शेवाळेवाडी येथील पी. एस. व्हिलामध्ये राहणारे पोलीस उपनिरीक्षक धनाजी रंगराव टोणे आणि त्यांची आई अनुसया रंगराव टोणे यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न करणे आणि बेकायदेशीर गर्भपात घडवून आणल्याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच छळाची मालिका
१९ मे २०१९ रोजी विवाह झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच पीडित महिलेचा छळ सुरू झाला. नोकरी करण्यासाठी दबाव आणण्यापासून सुरू झालेला हा छळ पुढे अमानुष मारहाणीत बदलला. २०२० मध्ये पहिल्यांदा गरोदर असताना सातव्या महिन्यात पोटावर आणि अंगावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. २०२२ मध्ये मुंबईतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धनाजी यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता; त्या अपमानाचा रागही त्यांनी घरामध्ये निष्पाप पत्नीचे डोकं फरशीवर आपटून काढला.
शेतात बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी अन् वाघोलीत जबरदस्तीने गर्भपात
मार्च २०२५ मध्ये पीडित महिला दुसऱ्यांदा गरोदर राहिली. १३ मे रोजी धनाजी आणि त्यांच्या आईने तिला बळजबरीने एका अज्ञात गावातील शेतात नेऊन बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी केली. गर्भातील बाळ मुलगी असल्याचे समजताच, पद आणि पोलीस पदाचा माज दाखवून तिच्या माहेरच्यांना धमकावण्यात आले. अखेर २३ मे रोजी वाघोलीतील एका रुग्णालयात पत्नीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने गर्भपात करण्यात आला.
तक्रार केल्यावर पुन्हा गळा आवळला; आरोपी PSI सुट्टी टाकून पसार
गर्भपातानंतर महिलेने पोलीस उपायुक्तांकडे (DCP) दाद मागितली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समज दिल्यानंतर संतापलेल्या टोणे यांनी “माझी तक्रार का केलीस?” असे म्हणत पुन्हा पत्नीला बेदम मारहाण केली आणि गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अखेर खालावलेल्या प्रकृतीत माहेरी पोहोचल्यानंतर पीडित महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेतली. हा तपास आता मांजरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून, गुन्हा दाखल होताच आरोपी पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे सुट्टी टाकून फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

