Latest Marathi News
Ganesh J GIF

कौटुंबिक वादातून पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या; आईला वाचवायला गेलेल्या अल्पवयीन मुलावरही चाकूने हल्ला

खेड शहरातील वाडा रोड परिसरातील संगम गार्डन येथे एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादातून पतीने स्वतःच्या पत्नीचा गळा आवळून निर्घृण खून केला. एवढ्यावरच न थांबता, आईच्या बचावासाठी धावून आलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचाही ओढणीने गळा आवळण्याचा आणि त्याच्यावर चाकूने वार करून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला.

या दुर्देवी घटनेमुळे खेड शहरात आणि परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेत दीपा महेंद्र दौंडकर (वय ४०) असे मृत महिलेचे नाव असून, आरोपी पती महेंद्र शिवाजी दौंडकर (वय ४५) याच्याविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आणि फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी (३० ऑगस्ट) सकाळी ९:३० ते ११:३० च्या दरम्यान संगम गार्डन, वाडा रोड येथील दौंडकर यांच्या राहत्या घरी घडली.

मृत दीपा दौंडकर या आरोपीच्या बहिणीशी बोलत नसल्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. या वादातून संतापलेल्या महेंद्र दौंडकर याने पत्नीचा गळा आवळून तिला ठार मारले. काही वेळाने मृत महिलेचा १७ वर्षीय मुलगा अथर्व हा आईला उठवण्यासाठी बेडरूममध्ये गेला असता, आरोपी महेंद्र याने त्याचाही ओढणीने गळा दाबून त्याला मारण्याचा प्रयत्न केला.

आईला वाचवण्याच्या प्रयत्नात अथर्व याने आरडाओरडा करत घराबाहेर पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी संतापलेल्या आरोपीने “तुला चाकूने भोसकून टाकीन” अशी धमकी देत त्याच्यावर थेट चाकूने वार केले. या हल्ल्यात अथर्वच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर गंभीर जखम झाली आहे. मुलाने कसबासा स्वतःचा जीव वाचवत पोलिसांत धाव घेतली.

या संपूर्ण प्रकरणाबाबत जखमी मुलगा अथर्व महेंद्र दौंडकर याने खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपी महेंद्र दौंडकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) [खून], १०९(१) [खुनाचा प्रयत्न] आणि ३५२ [धमकी देणे] अन्वये गुन्हा (रजिस्टर क्रमांक ५२४/२०२६) दाखल करण्यात आला आहे.सोमवारी (३१ ऑगस्ट) सकाळी ६:४७ वाजता या प्रकरणाची अधिकृत नोंद करण्यात आली असून, पुढील तपास खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!