
सांगलीत ‘कारभारीच निघाला लुटेरा’!; माजी सरपंचाने मारला बँक मॅनेजरच्या घरावर दरोडा; ६.५ लाखांचा ऐवज लंपास
सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थक्क करणारी घटना समोर आली आहे. गावात ज्याच्यावर लोकविश्वासाची जबाबदारी असते, त्याच एका माजी सरपंचाने चक्क एका बँकेच्या साहाय्यक व्यवस्थापकाचे बंद घर फोडून तब्बल साडेसहा लाखांचा ऐवज लंपास केला आहे. विश्रामबाग पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण (LCB) शाखेच्या तपासात हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अंकली (तालुका मिरज) येथील माजी सरपंच राहुल अनिल पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकी काय घडली घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, विश्रामबाग येथील एसटी कॉलनी परिसरात राहणारे अश्विन शिवकुमार पिल्ले हे एका राष्ट्रीयकृत बँकेत साहाय्यक व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. १९ ऑगस्ट रोजी पिल्ले कामानिमित्त बाहेरगावी गेले असता त्यांचे घर बंद होते. हीच संधी साधत चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील दागिने व रोख रकमेसह तब्बल ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेनंतर अश्विन पिल्ले यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात घरफोडीची फिर्याद दाखल केली होती.

सीसीटीव्ही फुटेजमुळे फुटला भांडाफोड
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने समांतर तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, त्यात अंकलीचा माजी सरपंच राहुल पाटील याचा संशयास्पद वावर दिसून आला. संशयावरून एलसीबीने त्याला ताब्यात घेऊन पोलिसी हिसका दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमालही जप्त केला आहे.
तपासावर संशयाचे जाळे: बातमी दडपण्याचा प्रयत्न?
गुन्हा उघडकीस आल्यानंतर माजी सरपंच राहुल पाटील याला वैद्यकीय कारणास्तव तत्काळ जामीन मंजूर झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ही एवढी मोठी आणि खळबळजनक घटना घडल्यानंतरही दोन-तीन दिवस ही माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचू दिली गेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची बातमी दडपण्यासाठी पोलिसांवर राजकीय दबाव होता की आणखी काही वेगळे कारण? याबाबत आता सांगली जिल्ह्यात विविध चर्चांना उधाण आले आहे.

