Latest Marathi News
Ganesh J GIF

मोठी बातमी! ‘ऑपरेशन टायगर’मुळे ठाकरेंना धक्का बसणार?; नवरात्रीपूर्वी १४ आमदार शिंदे गटात जाण्याच्या चर्चांनी राजकीय भूकंप

राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. ६ खासदारांनंतर आता ठाकरे गटाचे तब्बल १४ आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांमुळे खळबळ उडाली आहे. या ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर तातडीची बैठक बोलावली आहे.

‘ऑपरेशन टायगर’ अन् ३ मंत्र्यांवर मोठी जबाबदारी!

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून ठाकरे गटातील तब्बल १४ आमदारांना शिंदे गटात आणण्याची तयारी सुरू आहे. यासाठी सत्ताधारी पक्षातील तीन महत्त्वाच्या मंत्र्यांवर जबाबदारी सोपवण्यात आल्याचे समजते. कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील या मंत्र्यांकडे ठाकरे गटाच्या आमदारांशी संपर्क साधण्याची आणि चाचपणी करण्याची सूत्रे देण्यात आली आहेत.

मंत्रिपदं आणि महामंडळांची मागणी?

या संभाव्य पक्षप्रवेशाच्या बदल्यात काही आमदारांनी मंत्रिपदांसह सरकारमधील महत्त्वाच्या खात्यांची अपेक्षा व्यक्त केल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सुमारे सहा आमदारांना महत्त्वाच्या खात्यांसह मंत्रिपदाची अपेक्षा आहे, तर उर्वरित आमदारांना महामंडळांचे अध्यक्षपद किंवा राज्यमंत्रिपद देण्याबाबत पक्षांतर्गत चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. नवरात्रीपूर्वी हा मोठा राजकीय स्फोट होऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत.

उद्धव ठाकरेंनी बोलावली ‘मातोश्री’वर तातडीची बैठक

या सर्व राजकीय घडामोडी आणि संभाव्य बंडखोरीच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी मुंबईतील ‘मातोश्री’ निवासावर तातडीची बैठक बोलावली आहे. दुपारी १२ वाजता होणाऱ्या या बैठकीत पक्षातील संभाव्य घडामोडींवर आणि पुढील रणनीतीवर सखोल चर्चा होण्याची शक्यता असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.

ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी दावे फेटाळले

दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी या सर्व चर्चा आणि दावे स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. “ऑपरेशन टायगर करण्याची सरकारला काय गरज आहे? सरकारकडे आधीच पूर्ण बहुमत आहे, त्यांनी आधी आपल्या आमदारांना न्याय द्यावा. आमचे १४ आमदार फुटणार नाहीत, असं काहीही होणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, “ऑपरेशन टायगरच्या चर्चा नेहमीच सुरू असतात, मात्र सध्या राज्यासमोर शेतकरी, बेरोजगारी आणि पेपरफुटीचे गंभीर प्रश्न आहेत; सरकारने आधी त्यावर लक्ष द्यावे,” असा टोलाही त्यांनी लगावला.

‘मातोश्री’च्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

एकीकडे आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना उधाण आले असताना दुसरीकडे ठाकरे गटाकडून हे दावे फेटाळले जात आहेत. आता मातोश्रीवरील बैठकीनंतर उद्धव ठाकरे या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना काय उत्तर देतात आणि कोणती नवी रणनीती आखतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!