
“हा ‘लव्ह स्टोरी’चा खेळ नाही, ५० लाखांचा मोठा स्कॅम!”; पेपरफुटी प्रकरणाला प्रेमाचा अँगल देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न?
राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) फूड इन्स्पेक्टर परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यासह ६ जणांना अटक केली असली, तरी तपासाच्या दिशेवर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणात समोर आलेला ‘लव्ह अँगल’ केवळ मूळ सूत्रधारांना वाचवण्यासाठी आणि प्रकरण दडपण्यासाठी पुढे आणला जात असल्याचा खळबळजनक आरोप तक्रारदार ऋषिकेश गांगुर्डे यांनी केला आहे.

“चोर सोडून संन्यासाला पकडण्याचा प्रकार”

प्रकरणाची वस्तुस्थिती मांडताना ऋषिकेश गांगुर्डे म्हणाले, “पोलिसांकडून चोर सोडून संन्यासाला पकडण्याचे काम सुरू आहे. जो गौरव पाटील माझ्यासोबत या पेपरफुटीविरोधात तक्रार देण्यासाठी पुढे आला होता, त्यालाच पोलिसांनी आरोपी केले आहे. आम्ही दोघांनी वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन तक्रार नोंदवली होती. त्यानंतर आयोगातील लेंडवे नावाच्या अधिकाऱ्यालाही भेटलो होतो. मग तक्रार करणाराच आरोपी कसा असू शकतो?”

काय आहे ‘लव्ह स्टोरी’चा दावा?
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, परीक्षार्थी ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील यांच्यातील प्रेमसंबंधांमुळे हा प्रकार उघडकीस आल्याचे म्हटले जात होते. ऋतुजाच्या वडिलांनी एका दलालामार्फत परीक्षेच्या दोन दिवसांआधी पेपर मिळवला होता. ऋतुजाने प्रेमापोटी तो पेपर प्रियकर गौरवला दिला. पुढे परीक्षेत ऋतुजा उत्तीर्ण झाली, मात्र नंतर दोघांमध्ये वाद झाल्याने हे प्रकरण बाहेर आले.
“५० लाखांचा विक्रीचा खेळ अन् मास लेव्हल पेपरफुटी”
ऋषिकेश गांगुर्डे यांनी पोलिसांचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. त्यांच्या मते:
मूळ सूत्रधार: अटक झालेला नकाते नावाचा अधिकारी याने स्वतःच्या पुतण्यासाठी मुख्य पेपर फोडला.
५० लाखांची डील: हा पेपर पुढे एकाला तब्बल ५० लाख रुपयांना विकण्यात आला.
पैशांची वसुली: ५० लाख रुपये मोजणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे पैसे रिकव्हर करण्यासाठी प्रत्येकी १०-१० लाख रुपयांना हा पेपर इतरांना विकला.
नेटवर्क: तिथून पुढे ही ‘मास पेपरफुटी’ झाली असून सातारा, बीड आणि सोलापूर जिल्ह्यात याचे मोठे जाळे पसरले आहे. हे सर्व आरोपी एकमेकांचे नातेवाईक आहेत.
मास्टर पेपर फुटल्याने २० ते ३० प्रश्न जसेच्या तसे!
या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, फुटलेला पेपर हा ‘मास्टर पेपर’ होता. MPSC आयोगाने परीक्षेसाठी ४ सेट तयार केले असले, तरी या मास्टर पेपरमुळे प्रत्येक सेटमध्ये किमान २० ते ३० प्रश्न जसेच्या तसे आले. यामुळेच संबंधित विद्यार्थ्यांना अवाजवी गुण मिळाले आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय झाला, असा दावा गांगुर्डे यांनी केला आहे.
सीडीआर (CDR) तपासा, सर्व सूत्रधार सापडतील!
“माझी पोलिसांकडे ठाम मागणी आहे की, त्यांनी लेंडवे, नकाते आणि आणखी एका संशयित अधिकाऱ्याचे परीक्षेच्या दिवसापासूनचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR) तात्काळ तपासावेत. हे सीडीआर तपासल्यास या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार आणि सर्व आरोपी लगेच समोर येतील,” असे आवाहनही ऋषिकेश गांगुर्डे यांनी केले आहे. या नवीन आरोपामुळे MPSC पेपरफुटी प्रकरणाला अत्यंत गंभीर वळण मिळाले असून पोलीस प्रशासन आता काय भूमिका घेते, याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

