
देशभरात आज लहान-मोठ्या दुकानांमध्ये डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणावर केले जातात. चहाच्या टपरीपासून ते मोठ्या किराणा दुकानापर्यंत प्रत्येक ठिकाणी UPI द्वारे पेमेंट स्वीकारले जाते. परंतु, जर तुम्ही व्यापारी किंवा दुकानदार असाल आणि दुकानात QR Code द्वारे ऑनलाइन पेमेंट स्वीकारत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नवीन नियमांनुसार, देशभरातील दुकानदारांना १५ सप्टेंबरपर्यंत Re-KYC करणे बंधनकारक करण्यात आले आहे. दिलेल्या मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यास तुमच्या दुकानातील ऑनलाइन QR पेमेंट सुविधा बंद होऊ शकते.

Re-KYC न केल्यास काय होणार?

ऑनलाइन पेमेंट सुविधा देणाऱ्या प्रत्येक लहान-मोठ्या दुकानदाराला ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. जर १५ सप्टेंबरपर्यंत Re-KYC पूर्ण झाले नाही, तर दुकानदारांना QR Code द्वारे ग्राहकांकडून पैसे स्वीकारता येणार नाहीत. डिजिटल पेमेंट अचानक बंद झाल्यामुळे रोजच्या व्यवहारांवर आणि विक्रीवर मोठा परिणाम होऊ शकतो.

लाखो दुकानदारांचे QR पेमेंट धोक्यात?
‘Moneycontrol’ च्या अहवालानुसार, पेमेंट उद्योगातील तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे की, देशातील सुमारे ३० ते ३५ टक्के ऑफलाइन दुकानदार आणि तब्बल १० लाख ऑनलाइन व्यापारी १५ सप्टेंबरची मुदत चुकवू शकतात. विशेषतः ज्या दुकानदारांकडे फक्त क्यूआर कोड स्टँड (QR Code Stand) आहे, अशा सर्वांचे इन-पर्सन (प्रत्यक्ष) री-केवायसी करून घेणे पेमेंट कंपन्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.
री-केवायसी पूर्ण करण्यात काय अडचणी आहेत?
वेळेची कमतरता: Google Pay, PhonePe, Paytm यांसारख्या कंपन्यांवर रिझर्व्ह बँकेचा मोठा दबाव आहे. परंतु, देशातील लाखो दुकानदारांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून केवायसी करणे अत्यंत कठीण जात आहे. कागदपत्रांची कमतरता: अनेक लहान दुकानदारांकडे Re-KYC साठी आवश्यक असलेली योग्य आणि पुरेशी कागदपत्रे उपलब्ध नाहीत.
Soundbox असणाऱ्या दुकानदारांसाठी दिलासादायक बातमी!
ज्या दुकानदारांच्या दुकानात साऊंडबॉक्स (Soundbox) बसवलेला आहे, त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. पेमेंट उद्योगातील सूत्रांनुसार, साऊंडबॉक्स वापरणाऱ्या किंवा ९०% दुकानदारांचे Re-KYC सहज आणि वेळेत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
हा नियम कोणासाठी लागू आहे?
RBI चे हे कडक नियम केवळ व्यावसायिक, दुकानदार आणि पेमेंट ॲग्रिगेटर्ससाठी (Payment Aggregators) आहेत.सामान्य नागरिक किंवा ग्राहक जे दैनंदिन खरेदीसाठी UPI वापरतात, त्यांच्यासाठी हा नियम लागू नाही. त्यांच्या सेवा पूर्ववत सुरू राहतील. त्यामुळे जर तुम्ही दुकानदार असाल, तर त्वरित तुमच्या पेमेंट ॲपद्वारे किंवा प्रतिनिधीशी संपर्क साधून १५ सप्टेंबरपूर्वी री-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या!

