Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात धक्कादायक प्रकार! थेट बंडगार्डन पोलीस ठाण्यातूनच ७ पिस्तूलं चोरीला; पोलीस प्रशासनाच्या सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह!

गेल्या दोन-तीन वर्षांत पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांमधून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच आता पुणे पोलिसांच्या सुरक्षेची लक्तरे वेशीवर टांगणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षातूनच एका फिरस्त्याने चक्क सात पिस्तूलं लांबवल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारानंतर आरोपीने थेट पोलीस ठाण्यासमोरच एका व्यक्तीला पिस्तुलाचा धाक दाखवत ‘हँड्स अप’ करण्यास सांगितल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

शनिवारी दुपारी घडला नाट्यमय प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सेंट्रल बिल्डिंगसमोरील इमारतीत असलेल्या बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षात ठेवलेली सात पिस्तूलं राकेशकुमार संजयकुमार चिटेकर नावाच्या एका फिरस्त्याने चोरली. पिस्तूलं चोरल्यानंतर आरोपी संपूर्ण दिवसभर ती सोबत घेऊन परिसरात फिरत होता. त्यानंतर शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास तो साधू वासवानी चौकातून थेट बंडगार्डन पोलीस ठाण्यासमोर आला आणि त्याने तेथे एका व्यक्तीला पिस्तुलाचा धाक दाखवला. या अनपेक्षित प्रकारामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठी पळापळ आणि खळबळ उडाली.

झाडीत सापडली उरलेली ६ पिस्तूलं

नाट्यमय घडामोडींनंतर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपी राकेशकुमार चिटेकर याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने मुद्देमाल कक्षातून सात पिस्तूलं चोरल्याची कबुली दिली. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्याकडील पिशवीत उर्वरित ६ पिस्तूलं होती; मात्र ती पिशवी दुसऱ्या एका फिरस्त्याने लांबवली होती. पोलिसांनी तत्काळ परिसरातील CCTV फुटेजची तपासणी करत शोधमोहीम राबवली. अखेर जनरल पोस्ट ऑफिस (GPO) परिसरातील झाडीमध्ये ती पिशवी आणि उर्वरित सहा पिस्तूलं पोलिसांना सुखरूप सापडली.

२०२२ मधील कारवाईतील होता मुद्देमाल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सर्व सातही पिस्तूलं २०२२ मध्ये एका कारवाईदरम्यान जप्त करण्यात आली होती आणि ती बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षात सुरक्षित ठेवण्यात आली होती.

पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह!

जेथे नागरिक संरक्षणाची अपेक्षा करतात, अशा थेट पोलीस ठाण्याच्या सुरक्षित कक्षातूनच शस्त्रे चोरीला जात असतील, तर शहरात सुरक्षित कोण? असा संतप्त सवाल आता पुणेकरांमधून विचारला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून बंडगार्डन पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!