Latest Marathi News
Ganesh J GIF

तीन पानी जुगार अन् गोव्यातील कॅसिनोचे व्यसन; चैनीसाठी भावानेच चोरले १९ लाखांचे सोन्याचे दागिने!

तीन पानी जुगार आणि गोव्यातील कॅसिनोच्या नादात उधळपट्टी करण्यासाठी सख्या लहान भावानेच घरातील तसेच चुलत्याच्या घरातील तब्बल १४ तोळे सोन्याचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिंगणापूर (ता. करवीर) येथे हा प्रकार घडला असून, करवीर पोलिसांनी संशयित आरोपी भावाला अटक केली आहे. आदित्य संजय चौगुले (वय २१, रा. सूर्यनगरी, हणमंतवाडी रोड, शिंगणापूर, ता. करवीर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

नक्की काय आहे प्रकरण?

शिंगणापूर येथील व्यावसायिक आतिश संजय चौगुले (वय २६) यांच्या घरातून ऑक्टोबर २०२५ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत सुमारे १८ लाख ९७ हजार ३५० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. याप्रकरणी ३० ऑगस्ट २०२६ रोजी आतिश यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.करवीरचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक सुहास पोवार व त्यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. पोलिसांनी घरच्यांची व संशयितांची कसून चौकशी केली असता, फिर्यादी आतिश यांचा लहान भाऊ आदित्य चौगुले यानेच हे दागिने चोरल्याचे निष्पन्न झाले.

चुलत्याच्या घरातही मारला डल्ला

अटक केल्यानंतर पोलिसांनी आदित्यकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. स्वतःच्या घरात चोरी केल्यानंतर कोणालाही संशय येत नसल्याचे पाहून त्याने शेजारीच राहणाऱ्या चुलत्याच्या घरातूनही दागिने लंपास केले होते.

गोव्यात कॅसिनो अन् जुगारासाठी उधळपट्टी

आदित्यला तीन पानी जुगार खेळणे, गोव्यातील कॅसिनोमध्ये जाणे आणि महागडी चैन करण्याची सवय लागली होती. यासाठी लागणाऱ्या पैशांची सोय करण्यासाठी त्याने घरात कोणी नसताना दागिने आणि रोख रक्कम चोरली. चोरलेले दागिने त्याने एका सराफाला विकले होते. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत संबंधित सराफाकडून चोरीचे सर्व दागिने जप्त केले आहेत.

पोलीस पथकाची धडक कारवाई

ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक सुहास पोवार यांच्यासह पोलीस अंमलदार विजय तळसकर, महेश बांबळे, रणजित पाटील, प्रकाश कांबळे, प्रवीण बोरचाटे, श्रीधर जाधव, सोमराज पाटील, अमोल पाटील आणि आत्माराम शिंदे यांच्या पथकाने केली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!