
पुण्यात ध्वनीप्रदूषण प्रकरणी पहिली मोठी कारवाई!; नियम मोडणाऱ्या दहीहंडी मंडळावर गुन्हा दाखल; साऊंड सिस्टिम जप्त
पुण्यात सण-उत्सवातील ‘डीजे’ आणि ध्वनीप्रदूषणावर बंदी घालण्याची जोरदार मागणी होत असतानाच प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दहीहंडी उत्सवा दरम्यान परवानगीपेक्षा दुप्पट लाऊडस्पीकर लावून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुण्यातील एका प्रसिद्ध दहीहंडी मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्सव काळात ध्वनीप्रदूषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना ठरली आहे.

बिबवेवाडीतील ‘श्रीकृष्ण तरुण मंडळा’वर कारवाई

पुण्याच्या बिबवेवाडी भागातील ‘श्रीकृष्ण तरुण मंडळ’ आणि मंडळाचे अध्यक्ष राहुल प्रकाश जगताप यांच्याविरोधात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की काय घडले?
मंडळाला दहीहंडी कार्यक्रमासाठी ४ बेस (Base) आणि ४ टॉप (Top) लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी देण्यात आली होती.मात्र, या नियमांचा भंग करत मंडळाने तब्बल ८ बेस आणि ८ टॉप लाऊडस्पीकर लावले.यामुळे परिसरात प्रचंड आवाज होऊन नागरिकांना मोठा त्रास झाला आणि ध्वनीप्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवले गेले.
पोलिसांची धडक कारवाई; साऊंड सिस्टिम केली जप्त
नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास येताच बिबवेवाडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या मंडळाची संपूर्ण साऊंड सिस्टिम जप्त केली आहे.पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी उत्सवापूर्वीच सर्व मंडळांना ध्वनीप्रदूषण टाळण्याचे आवाहन केले होते. तसेच ४ बेस आणि ४ टॉपपेक्षा जास्त साऊंड सिस्टिम लावल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला होता. त्यानुसार पोलिसांनी ही प्रत्यक्ष कारवाई करून दाखवली आहे.
राज्यात इतरत्र उत्साह अन् नियमांचे पालन
दरम्यान, या एका घटनेचा अपवाद वगळता पुण्यात दहीहंडी उत्सव अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडत आहे. बहुतांश मंडळांनी पोलीस प्रशासनाच्या नियमांचे पालन करत, तर काही ठिकाणी पारंपरिक वाद्य आणि ढोल-ताशांच्या गजरात दहीहंडी साजरी केली आहे.

