
साताऱ्यात संतापाची लाट! ऐतिहासिक संगम माहुली घाटावर अघोरी कृत्य; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीजवळ आढळली काळी बाहुली
ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाने नटलेल्या साताऱ्यातील प्रसिद्ध संगम माहुली घाटावर एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक अघोरी कृत्य उघडकीस आले आहे. छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांच्या समाधी परिसरातच हा अघोरी प्रकार घडल्याने संपूर्ण सातारा शहरात नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

ऐतिहासिक घाटावर काय घडलं?

संगम माहुली घाटावर नेहमीप्रमाणे भटकंतीसाठी गेलेल्या काही इतिहास अभ्यासकांना कृष्णा-वेण्णा नदीच्या संगमाजवळ अघोरी कृत्याचे साहित्य आढळून आले. यामध्ये जमिनीवर ४ ते ५ फूट लांबी-रुंदीचे पांढऱ्या रंगाचे त्रिकोण, चौकोन व वर्तुळ, चौकोनात टाचण्या टोचलेले आणि अबीर लावलेले लिंबू,मोठ्या प्रमाणावर कुंकू सांडलेली काळी बाहुली. बाहुलीला टाचण्या टोचून त्याच्या पाठीमागे नावे लिहिलेली चिठ्ठी चिकटवण्यात आली होती.

पुरोगामी साताऱ्यात अंधश्रद्धेला खतपाणी
सातारा शहर हे पुरोगामी विचारांची आणि छत्रपतींच्या विचारांची परंपरा जपणारे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शहरात अशा विघ्नसंतोषी प्रकारांमध्ये वाढ झाली आहे.याआधी गेल्याच महिन्यात शहरातील मध्यवर्ती शाहू चौक आणि राजपथावरील खण आळी परिसरात असाच अघोरी प्रकार समोर आला होता. आता थेट धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या संगम माहुली घाटावर हा प्रकार घडल्याने सातारकरांच्या भुवया उंचावल्या आहेत.
परिसराचे पावित्र्य जपण्याचे आवाहन
थोरल्या छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत पंतप्रतिनिधी, पंतसचिव, पेशवे आणि सावकारांनी पुढाकार घेऊन संगम माहुली घाटाची निर्मिती केली होती. मराठा स्थापत्य शैलीतील तब्बल ३० हून अधिक मंदिरांची अद्वितीय मालिका येथे पाहायला मिळते. अशा ऐतिहासिक अन् पवित्र ठिकाणी अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आणि या घाटाचे पावित्र्य जपण्याची मागणी आता सातारकर करत आहेत.

