Latest Marathi News
Ganesh J GIF

तब्बल १८ वर्षे अंथरुणाला खिळलेल्या ‘त्या’ दुर्दैवी गोविंदाच्या मदतीला धावले मंत्री प्रताप सरनाईक; उपचाराचा सर्व खर्च उचलण्याची घोषणा

मुंबई-ठाण्यासह राज्यभरात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच, दुसरीकडे एका जखमी गोविंदाच्या आयुष्यातील दुःखाची किनार पुन्हा एकदा समोर आली आहे. २००९ मध्ये दहीहंडीच्या थरावरून कोसळून गेल्या १८ वर्षांपासून अंथरुणात खितपत पडलेल्या भिवंडीतील गोविंदा नागेश भोईर याच्या मदतीला अखेर मंत्री प्रताप सरनाईक धावून आले आहेत. नागेशच्या उपचाराचा सर्व खर्च उचलण्याची आणि त्याच्या कुटुंबाला ५ लाख रुपयांची मदत देण्याची मोठी घोषणा प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

२४ व्या वर्षी घडला तो दुर्दैवी अपघात

भिवंडीतील गोविंदा नागेश भोईर याचा २००९ मध्ये दहीहंडीच्या थरावर चढताना भीषण अपघात झाला होता. अवघ्या २४ वर्षांच्या वयात थरावरून थेट जमिनीवर कोसळल्याने त्याच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली.दीर्घोपचारानंतरही त्याला कायमचे अपंगत्व आले आणि तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकला नाही. एका अपघाताने त्याचे सामान्य व्यक्तीसारखे जगण्याचे स्वप्न कायमचे अपूर्ण राहिले.

सोशला मीडियावरून मांडली होती व्यथा

काही दिवसांपूर्वीच नागेशने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या अपघाताची आणि त्यानंतरच्या कटू प्रसंगांची व्यथा मांडली होती.अपघातानंतर सुरुवातीला मित्र आणि ओळखीच्या लोकांनी मदत केली, पण काळानुसार ती मदत बंद झाली.रुग्णालयाचा अफाट खर्च पेलणे कुटुंबासाठी कठीण झाले होते. त्यामुळे “आर्थिक मदतीपेक्षा सरकारने माझ्या उपचारांचा खर्च उचलावा,” अशी आर्त हाक त्याने प्रशासनाला दिली होती.

प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

नागेशची ही व्यथा समोर आल्यानंतर ठाण्यातील ‘संस्कृती दहीहंडी’ उत्सवादरम्यान मंत्री प्रताप सरनाईक यांनी नागेश भोईर आणि त्याच्या कुटुंबासाठी मोठा निर्णय घेतला. नागेशच्या आगामी सर्व वैद्यकीय उपचारांचा खर्च स्वतः उचलणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. नागेशच्या कुटुंबाला ५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.मंत्री सरनाईक यांच्या या निर्णयामुळे गेल्या १८ वर्षांपासून उपचाराच्या प्रतीक्षेत असलेल्या नागेश आणि त्याच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!