
पुण्यात गुंडांची मुजोरी! रेल्वे पोलिसावर चाकूने प्राणघातक हल्ला; गळ्यावर वार करून सोन्याची साखळी अन् मोबाईल लांबवला
पुणे रेल्वे स्थानक परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा धज्जा उडवणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. भररस्त्यात एका रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यावर चार जणांच्या टोळक्याने चाकूने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये संबंधित पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोरच थरार

ही घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या समोरील रस्त्यावर घडली. अक्षय बोंबाळे असे जखमी झालेल्या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांनी स्वतः या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बोंबाळे हे आपले काम संपवून जात असताना विकी पात्र, रॉकी पात्र आणि त्यांच्या दोन अज्ञात साथीदारांनी त्यांना अडवले.

‘तुला आता जिवंत सोडणार नाही…’ जुन्या रागातून हल्ला
“मी विकीच्या आईला तो दारू आणि गांजा पितो असं सांगितलं,” असा संशय आरोपी विकीच्या मनात होता. याच गैरसमजातून आरोपींनी बोंबाळे यांच्याशी तीव्र वाद घातला आणि “तुला आता जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देत थेट चाकूने हल्ला चढवला.
हातपाय पकडून गळ्यावर अन् छातीवर वार
हल्ल्यादरम्यान आरोपींच्या दोन साथीदारांनी पोलीस कर्मचारी बोंबाळे यांचे हातपाय घट्ट पकडून ठेवले. यानंतर आरोपी विकीने चाकूने थेट त्यांच्या गळ्यावर वार केला, तर रॉकीने छातीवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. अचानक झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामुळे बोंबाळे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.
लुटमार करून आरोपी फरार
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कर्मचाऱ्याजवळील मोबाईल आणि गळ्यातील सोन्याची साखळी (चैन) आरोपींनी जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि तिथून पळ काढला. या घटनेप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. पुढील तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.

